नवी दिल्ली : ज्या प्रवाशांनी १ जुलैपूर्वी जुन्या तिकीट दरांनुसार तिकीट खरेदी केले आहे. त्यांच्याकडून तिकिटाची वाढीव रक्कम वसूल केली जाणार नाही, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ ‘टीटीई’ प्रवासादरम्यान तुमच्याकडून कुठलीही अतिरिक्त रक्कम घेऊ शकणार नाही. तिकीटामधील नवी भाडेवाढ ही १ जुलैपासून लागू होणार आहे. तत्पूर्वीच्या आरक्षित तिकिटांवर ही भाडेवाढ लागू होणार नाही.
मंगळवारपासून देशभरात काही नवे नियम लागू झाले. त्यानुसार रेल्वेने आपल्या तिकिटांच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे तिकिटांचे दर वाढले आहेत. रेल्वेच्या मेल आणि एक्स्प्रेस आदी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही भाडेवाढ ठळकपणे झाली आहे. ही भाडेवाड अंतराच्या हिशोबाने करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्यांनी १ जुलैपूर्वी तिकिटाचे आरक्षण केले आहे त्यांना प्रवासादरम्यान अधिक भाडे द्याव लागणार का, असा प्रश्न विचारला जात होता त्यावर रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
रेल्वेच्या तिकिटांवरील भाडेवाढ मंगळवारपासून लागू झाली आहे. २०२० नंतर पहिल्यांदाच रेल्वेच्या तिकिटांमध्ये ही भाडेवाढ झाली आहे. तसेच १ जुलैपासून कमाल २ पैसे प्रति किमीपर्यंत ही भाडेवाढ करण्यात आली आहे, तर मेल-एक्स्प्रेसमध्ये विना वातानुकूलित आसनाचे भाडे हे १ पैसा प्रतिकिमी या दराने वाढले आहे, तर वातानुकूलित श्रेणीमधील भाडे हे २ पैसे प्रति किमी दराने वाढले आहे.
याबाबत रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सामान्य विनावातानुकूलित ट्रेनमध्ये द्वितीय श्रेणीसाठी ५०० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कुठलीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही, तर ५०१ किमी ते १५०० किमी अंतरापर्यंतच्या तिकिटावर ५ रुपये, १५०० किमी ते २५०० किमीच्या तिकिटावर १० रुपये. २५०० किमी ते ३००० किमीच्या तिकिटावर १५ रुपये एवढी भाडेवाढ झाली आहे.