अटल टनेलबाहेर भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात; लोखंडी सळ्या आरपार घुसल्याचा VIDEO समोर; एकाचा मृत्यू, तिघे जखमी 
राष्ट्रीय

अटल टनेलबाहेर भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात; लोखंडी सळ्या आरपार घुसल्याचा VIDEO समोर; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

हिमाचल प्रदेशातील अटल बोगद्याजवळ भरधाव स्कॉर्पिओ बांधकामाधीन पुलावर आदळल्याने भीषण अपघात झाला. यावेळी लोखंडी सळ्या गाडीच्या आरपार गेल्या. या भीषण अपघातात राजस्थानातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले.

Mayuri Gawade

हिमाचल प्रदेशातील मनाली येथे भरधाव स्कॉर्पिओचा भीषण अपघात होऊन एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. अटल बोगद्यातून (अटल टनेल) बाहेर पडताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ रस्त्याबाहेर जाऊन बांधकामाधीन पुलाच्या लोखंडी सळ्यांवर आदळली. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

लोखंडी सळ्या स्कॉर्पिओच्या आरपार घुसल्या...

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाची स्कॉर्पिओ बांधकामाधीन पुलाच्या खांबाजवळ अडकलेली दिसत आहे. पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक लोखंडी सळ्या वाहनाच्या आरपार घुसल्याचे दिसत असून, अपघाताची तीव्रता या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे. या भीषण धडकेनंतर वाहनाचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला.

वळणावर सुटले नियंत्रण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील पर्यटकांचा एक गट मंगळवारी (दि. १) रात्री मनालीहून लाहौलकडे निघाला होता. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांची स्कॉर्पिओ अटल बोगद्याच्या उत्तर प्रवेशद्वारातून बाहेर पडली. बोगद्यानंतर असलेल्या वळणावर वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाला स्कॉर्पिओवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यानंतर वाहन बॅरिकेड्स तोडून चंद्रा नदीच्या दिशेने रस्त्याबाहेर गेले आणि बांधकामाधीन पुलावरील लोखंडी सळ्यांवर आदळले. या धडकेमुळे सळ्या वाहनात आरपार घुसल्या आणि प्रवासी वाहनातच अडकून पडले.

एकाचा मृत्यू, तिघे जखमी

या अपघातात राजस्थानमधील सीकर येथील ३४ वर्षीय कैलाश यांचा जागीच मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील आदित्य, राजस्थानातील सीकर येथील राजेंद्र आणि स्कॉर्पिओचा चालक सिद्धार्थ हे तिघेजण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांचे पर्यटकांना आवाहन

सिसू पोलीस ठाण्याचे अधिकारी मुकेश राठोर यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात अतिवेग हे अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. मृत पर्यटकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. नातेवाईक आल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

दरम्यान, पावसाळ्यात डोंगराळ भागातील रस्ते निसरडे होतात आणि दृश्यमानता कमी असते. त्यामुळे पर्यटकांनी रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा आणि अतिवेगाने वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाण्याला पावसाने झोडपले; धरण क्षेत्रातही दमदार हजेरी

Mumbai Rains : गटारात पडलेल्या व्यक्तीची दहिसर पोलिसांकडून सुखरूप सुटका; बचावकार्याचा Video व्हायरल

व्यावसायिक एलपीजी १८३ रुपयांनी कमी, पुरवठाही सुरळीत

Ulhasnagar : पाण्याच्या विळख्यात अडकलेल्या आजीबाईंची अग्निशमन दलाकडून सुटका

Mira Bhayandar : क्रिकेट प्रशिक्षकाकडून महिला क्रिकेटपटूचा विनयभंग