सोन्याच्या तस्करीप्रकरणी कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रान्या ही कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. राव हे कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ही घटना माझ्यासाठीही धक्कादायक असल्याचे रामचंद्र राव म्हणाले.
"माझ्यासाठीही ही घटना धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी आहे. मला या प्रकरणाची कोणतीही कल्पना नव्हती. अन्य कोणत्याही पित्याप्रमाणे हे माझ्यासाठीही धक्कादायक आहे. ती आमच्यासोबत राहत नाही, ती पतीसह स्वतंत्र राहते. त्यांच्यात नक्कीच काही समस्या असाव्यात...कदाचित काही कौटुंबिक कारणे असतील. मात्र, कायदा आपले काम करेल. माझ्या कारकीर्दीवर कधीच कोणतेच काळे डाग नाहीत. मी यापेक्षा अधिक काही बोलू इच्छित नाही," अशी प्रतिक्रिया राव यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिली. तर, "चार महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला असून, त्यानंतर ती आमच्याकडे आली नाही. तिच्या किंवा तिच्या पतीच्या व्यवसायिक व्यवहारांविषयी आम्हाला कोणतीही माहिती नाही," असे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्री रान्या राव गेल्या १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास करून आली होती. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांना तिच्यावर संशय बळावला. यानंतर, सोमवारी रात्री तिला प्रथम तपासणीसाठी आणि नंतर चौकशीसाठी रोखण्यात आले. तपासादरम्यान, तिच्याकडून मोठ्या प्रमाणात ( १४.८ किलो ) सोने जप्त करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रान्याने विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेला चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे, तर एका कॉन्स्टेबलने तिला कोणतीही सुरक्षा तपासणी न करता विमानतळाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे. तपास अधिकारी आता या दाव्याची सत्यता पडताळत असून, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कोणत्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती होती किंवा कोणी तिला मदत केली का, याचा शोध घेत आहेत. तसेच, अधिकाऱ्यांकडून ती एकटी तस्करी करीत होती की की दुबई आणि भारतामधील मोठ्या तस्करी नेटवर्कचा भाग आहे, याची सखोल तपासणी सुरू आहे.