राष्ट्रीय

रीलच्या नादात तिघा सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू; स्टंट करताना बाईक ट्रेलरवर जाऊन धडकली, VIDEO व्हायरल

मध्य प्रदेशात रील बनवताना वेगात बाईक चालवणाऱ्या तिघा सख्ख्या भावांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. VIDEO व्हायरल झाल्यानंतर धोकादायक स्टंट ट्रेंडवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Mayuri Gawade

सोशल मीडियावर ‘रील’ बनवण्याच्या नादात जीव गमावल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील मऊगंज येथे घडली आहे. धोकादायक स्टंट करताना वेगात असलेली बाईक थेट ट्रेलरवर जाऊन आदळली आणि तीन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

स्टंट करताना सुटले नियंत्रण

१४ एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, पाच तरुण या घटनेत सहभागी होते. त्यापैकी तीन जण एका मोटारसायकलवर ट्रिपल सीट बसून स्टंट करत होते, तर दोघजण दुसऱ्या बाईकवरून त्यांचा व्हिडिओ शूट करत होते.

रील अधिक आकर्षक दिसावी यासाठी चालकाने बाईकचा वेग वाढवला. याचदरम्यान मागे बसलेला एक तरुण हातात देशी बनावटीची पिस्तूल फिरवत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते.

क्षणात घडली भीषण दुर्घटना

व्हिडिओमध्ये बाईक वेगाने ट्रेलर ओव्हरटेक करताना दिसते. मात्र काही क्षणांतच चालकाचा ताबा सुटतो आणि बाईक थेट ट्रेलरवर जाऊन आदळते. माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मागून येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलीनेही त्याच ट्रेलरला धडक दिली. त्यावर असलेले दोन तरुण गंभीर जखमी झाले.

व्हायरल व्हिडिओ पाहा

मृतांची ओळख पटली

या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची ओळख उपलक्ष्य कोल (१७), अमरीश कोल (२२) आणि हेमराज कोल (१७) अशी झाली आहे. हे तिघेही सख्खे भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळावरून पोलिसांनी देशी बनावटीची पिस्तूल जप्त केली आहे. अतिवेग, निष्काळजीपणा आणि जीवघेणे स्टंट हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर सोशल मीडियावर ‘रील’साठी जीव धोक्यात घालणाऱ्या ट्रेंडवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, तरुणांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे, असे आवाहन केले जात आहे.

विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये भीषण अपघात! वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्याने ८ कामगारांचा मृत्यू, अनेकजण जखमी

लग्नाआधीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

'तात्काळ देश सोडा'; इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट, भारत सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

फिलिपिन्समध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा हाय अलर्ट जारी, थरकाप उडवणारे Video व्हायरल

पोलिसाच्या मुलाला कॉपी करताना पकडलं; संतप्त वडिलांनी कॉलेजमध्ये घुसून शिक्षकांनाच कानफडलं, VIDEO व्हायरल