नवी दिल्ली : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवण्याचे, चिरडण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा राहिला. प्रत्येक स्वयंसेवकाने नेहमी समाजासाठी काम केले, राष्ट्र प्रथम या भावनेतूनच काम केले, राष्ट्रउभारणीत संघाचे मोठे योगदान आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, संघाच्या १०० वर्षांच्या गौरवमयी प्रवासाच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने विशेष टपाल तिकिट आणि १०० रुपयांचे स्मृती नाणे जारी केले. या नाण्यावर एका बाजूला भारताचे राष्ट्रीय चिन्ह असून दुसऱ्या बाजूला सिंहासह वरदमुद्रेतील भारतमातेची प्रतिमा आहे.
प्रेरणादायी उदाहरण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या प्रवासात अनेकदा हल्ले झाले, संघाला मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्यासाठी षड्यंत्रे रचण्यात आली. गोळवलकर गुरुजींना खोट्या खटल्यात अडकवून जेलमध्ये टाकण्यात आले. पण जेव्हा ते जेलमधून बाहेर आले, तेव्हा त्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण दिले. 'कधी कधी जीभ दातांखाली येते, दाबली जाते, चिरडली जाते. पण आपण दात मोडत नाही, कारण दातही आपलेच आहेत आणि जीभही आपलीच आहे., असे मोदी म्हणाले.
विशेष टपाल तिकिट, नाणे जारी
संघाच्या १०० वर्षांच्या गौरवमयी प्रवासाच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने विशेष टपाल तिकिट आणि १०० रुपयांचे स्मृती नाणे जारी केले. या नाण्यावर एका बाजूला भारताचे राष्ट्रीय चिन्ह असून दुसऱ्या बाजूला सिंहासह वरदमुद्रेतील भारतमातेची प्रतिमा आहे.
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक
घुसखोरी आणि बाह्य शक्तींपेक्षाही मोठा धोका जनसांख्यिकी बदलाचा आहे. घुसखोरी आणि बाह्य शक्ती हे दीर्घकाळापासूनच देशाच्या एकतेसाठी आव्हान ठरले आहेत. मात्र, आज मोठे आव्हान आहे ते जनसांख्यिकी बदलाचे. कारण यामुळे सामाजिक समानता कमकुवत होत आहे. दसऱ्यापूर्वी मोदी यांनी देशवासियांना हा इशारा दिला आहे.
सामान्य व्यक्तींचे असामान्य कार्य
भारताच्या विभाजनाच्या वेदनेत लाखो कुटुंबे बेघर झाली होती. त्या वेळी स्वयंसेवकांनी शरणार्थ्यांची निःस्वार्थ सेवा केली. संविधानिक संस्थांबद्दलची आस्था आणि समाजाशी असलेली आत्मीयता यांनी प्रत्येक स्वयंसेवकाला स्थितप्रज्ञ आणि संवेदनशील ठेवले. संघाबद्दल म्हटले जाते की, येथे सामान्य माणसे एकत्र येऊन असामान्य आणि अभूतपूर्व कार्य करतात. ही व्यक्तिनिर्मितीची सुंदर प्रक्रिया आजही संघाच्या शाखांमध्ये पाहायला मिळते. संघ शाखेचे मैदान ही अशी प्रेरणाभूमी आहे, जिथे स्वयंसेवकाचा प्रवास ‘अहं’ पासून ‘वयं’ पर्यंत होतो. शाखा म्हणजे व्यक्तिनिर्माणाची यज्ञवेदी असून, तीच संघाच्या शतकभराच्या कार्याची खरी ओळख आहे, असेही मोदी म्हणाले.