राष्ट्रीय

साक्षी मलिक रडली, म्हणाली; ‘मी कुस्ती सोडली!’: ब्रिजभूषण यांच्या निकटवर्तियाची WFI अध्यक्षपदी निवड होताच निवृत्तीची घोषणा

Swapnil S

भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकीत माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड होताच ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठी घोषणा केली आहे. तिने पत्रकार परिषद घेत कुस्तीतून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. यावेळी तिला रडू कोसळले. आम्ही महिला अध्यक्षाची मागणी केली होती. महिला अध्यक्ष असल्यास छळ होणार नाही. मात्र, कुस्ती महासंघात या आधीही महिलांचा सहभाग नव्हता आणि आजची यादी बघितली तर एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. आम्ही पूर्ण ताकदीने लढलो, हा लढा अजूनही सुरुच राहणार आहे. नव्या पिढीच्या पैलवानांना लढायचे आहे, असे म्हणत साक्षीने कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पत्रकार परिषद सुरु असताना साक्षी मलिकला रडू कोसळले आणि ती पत्रकार परिषद अर्धवट सोडून निघून गेली.

आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो होतो. देशातील कानाकोपऱ्यातील लोक आम्हाला पाठिंबा द्यायला येत होते. जर ब्रिजभूषण सिंह यांचे बिझनेस पार्टनर आणि जवळचे सहकारीच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होत असतील तर मी कुस्ती सोडते, असेही साक्षी यावेळी म्हणाली.

या पत्रकार परिषदेला ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगाट हे देखील उपस्थित होते. विनेश फोगाट म्हणाली, "आमच्या किमान अपेक्षा आहेत, आम्हाला न्याय मिळले अशी आशा आहे. कुस्तीचे भविष्य अंधारात आहे हे खेदजनक आहे. आपले दु:ख कोणाला सांगायचे? आम्ही अजूनही लढतोय." असे म्हणताना विनेशलाही अश्रू आवरणे कठीण झाले होते.

दररम्यान, कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले होते. त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटू यांनी आंदोलन छेडले होते. यानंतर ब्रिजभूषण यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर ११ महिन्यांनी झालेल्या WFI च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांच्या कुटुंबातील कोणलाही सहभागी न होण्यास सांगितले होते. मात्र, कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह हे ब्रिजभूषण यांच्या मर्जीतले असल्याने साक्षी मलिकने कुस्ती सोडल्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त