मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्वपक्षीय नेत्यांची दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्याला या बैठकीस उपस्थित राहता येणार नाही, मात्र आपण या गंभीर विषयाच्या अनुषंगाने पत्र लिहिले त्याबद्दल आपले आभार अशा शब्दात केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी रिप्लाय दिल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात निरपराध नागरिकांना, त्यातही प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्याप्रमाणे हिंदूंना लक्ष्य करण्यात आल्याच्या घटनेप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो आणि या काळात आम्ही भारत सरकार सोबत आहोत. सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीसाठी संसदेतील पक्षनेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र खासदार संजय राऊत आणि मी, अरविंद सावंत दोघेही सध्या संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत शिष्टमंडळासोबत देशाच्या विविध भागांमध्ये आहोत. ही ठिकाणे दुर्गम आहेत, त्यामुळे वेळेत दिल्लीला पोहोचणे अशक्य आहे. त्यामुळे आम्हाला जर दूरसंचाराद्वारे, सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या चर्चेत सहभागी होता आले, तर आम्ही अत्यंत आभारी राहू, असे पत्र शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांना लिहिले होते.
ठाकरे सेनेचे खासदार खोटारडे - म्हस्के
केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवणारे ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंत आणि संजय राऊत हे खोटारडे आहेत, असे खासदार म्हस्के म्हणाले. दुर्गम भागात दौरा असल्याचे खोटे कारण देऊन अरविंद सावंत बैठकीला अनुपस्थित राहिले, तर संजय राऊत यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली मग ते कुठल्या दुर्गम भागात गेलेत की ते राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठकीस उपस्थित राहू शकत नाहीत, असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला.