सध्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरु आहे. यावेळी संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक दिसून आली. संसदेच्या लोकसभा सभागृहात कामकाज सुरु असताना दोन अज्ञात व्यक्ती घुसल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. उल्लेखनीय म्हणजे 2001 मध्ये आजच्याच दिवशी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता
प्राप्त माहितीनुसार, दोन युवकांनी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून टिअर गॅस कॅन घेऊन खासदार बसतात त्या ठिकाणी उड्या मारल्या. यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. कामकाजावेळी घुसखोरी केलेल्या दोघांपैकी एका व्यक्तीचं नाव हे सागर असल्याचं सांगितलं जात आहे. हे दोघे खासदाराच्या नावाने आलेल्या लोकसभा व्हिजीटर पासवर संसदेत आले होते. हे दोघे म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावावर लोकसभा व्हिजीटर पास घेऊन आले असल्याची माहिती खासदार दानिश अली यांनी दिली आहे.
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुणांनी गलरीतून सभागृहात उड्या मारत काहीतरी फेकलं. ज्यामधून गॅस बाहेर येत होता. यानंतर खासदारांनी यांना पकडलं आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना सभागृहातून बाहेर काढलं. घडलेल्या या प्रकारामुळे सभागृहाच कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. घडलेला प्रकार हा निश्चितपणे सुरक्षेचे उल्लंघन आहे. कारण आज आपण २००१ मध्ये ज्यांनी बलिदान दिलं त्यांची पुण्यातीथी साजरा करत आहोत.
नेमकं काय घडलं?
शुन्य प्रहरादरम्यान भाजप खासदार खरगेन मुर्मू बोलत असताना एका व्यक्तीने लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली. यानंतर त्याच्या मागे लगेच दुसऱ्या वक्तीने देखील उडी मारली. यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. काही खासदारांनी मिळून या दोघांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या हवाली केलं. या दोघांना संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या अँटी टेरर युनिटच्या स्पेशल सेलकडून या घुसखोरी करणाऱ्यांची चौकशी सुरु आहे.