सिरप वादानंतर श्रेशन औषध कंपनी बंद  
राष्ट्रीय

सिरप वादानंतर श्रेशन औषध कंपनी बंद

तमिळनाडूतील श्रेशन फार्मास्युटिकल्स या औषधनिर्मिती कंपनीचा उत्पादन परवाना रद्द करण्यात आला असून कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कंपनीने तयार केलेले व आता बंदी घातलेले ‘कोल्ड्रिफ’ हे खोकल्याचे सिरप दूषित असल्याचा आरोप आहे, असे राज्य सरकारने सोमवारी सांगितले.

Swapnil S

चेन्नई : तमिळनाडूतील श्रेशन फार्मास्युटिकल्स या औषधनिर्मिती कंपनीचा उत्पादन परवाना रद्द करण्यात आला असून कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कंपनीने तयार केलेले व आता बंदी घातलेले ‘कोल्ड्रिफ’ हे खोकल्याचे सिरप दूषित असल्याचा आरोप आहे, असे राज्य सरकारने सोमवारी सांगितले.

राज्य औषध नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान या सिरपमध्ये ४८.६ टक्के डायएथिलीन ग्लायकोल हे विषारी द्रव्य असल्याचे आढळले. या औषधाचा संबंध मध्य प्रदेशातील मुलांच्या मृत्यूशी जोडला गेला आहे.

अधिकाऱ्यांना तपासात हेही आढळले की, कंपनीकडून योग्य औषधनिर्मिती पद्धती (जीएमपी) आणि प्रयोगशाळा पद्धती (जीएलपी) यांचे पालन होत नव्हते. तपासात ३०० हून अधिक गंभीर आणि मोठ्या उल्लंघनांची नोंद करण्यात आली आहे.

या कंपनीचा मालक जी. रंगनाथन यांना नुकतीच मध्य प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने अटक केली. सोमवारीच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत श्रेशन फार्मास्युटिकल्स आणि काही अधिकाऱ्यांच्या ठिकाणी छापे टाकले. श्रेशन फार्मास्युटिकल्स कंपनीचा औषधनिर्मिती परवाना पूर्णपणे रद्द केला असून कंपनी बंद करण्यात आली आहे. तमिळनाडूमधील इतर औषधनिर्मिती कंपन्यांची सविस्तर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पारासिया परिसरातील किमान २२ मुलांचा संशयित मूत्रपिंड निकामी होऊन मृत्यू झाला आहे. या सर्व मुलांनी बंदी घातलेले कोल्ड्रिफ खोकल्याचे सिरप सेवन केले होते.

काही इतर मुले सध्या महाराष्ट्रातील नागपूरमधील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. छिंदवाड्यातील अनेक मुलांना अत्याधुनिक उपचारांसाठी नागपूरला हलवण्यात आले होते, परंतु त्यांचा मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यू झाला.

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

तुम्ही राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करत आहात? सर्वोच्च न्यायालयाने ED ला फटकारले

महसूल विभागाची मुंबईकरांना दिवाळी भेट! महत्त्वाच्या कागदपत्रांच्या नोंदणीसाठीची 'ही' अट रद्द

अखेर वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

बिबट्या व हरणाची पिल्ले मी देखील पाळली; नाईकांच्या खुलाशावर पाटकरांचा संताप