नवी दिल्ली : २०२५ मध्ये जागतिक पातळीवरील सर्व मालमत्ता वर्गांना मागे टाकत सोने आणि चांदीने विक्रमी परतावा दिला. दशकांतील सर्वात दमदार कामगिरी करत चांदीच्या दरात वर्षभरात १६९ टक्के तर सोन्याच्या दरात ७६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. अत्यंत अस्थिर जागतिक परिस्थितीत मौल्यवान धातू हे ‘अँकर’ गुंतवणूक वर्ग असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
वाढते भू-राजकीय तणाव, अस्थिर शुल्क (टॅरिफ) धोरणे आणि सततच्या पुरवठा-साखळी अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेने नवे समीकरण मांडले.
केंद्रीय बँकांची खरेदी, भू-राजकीय जोखीम, ईटीएफ प्रवाह आणि पुरवठा-साखळी अडथळे या सगळ्या घटकांमुळे २०२६ मध्येही सोने आणि चांदी आपले धोरणात्मक महत्त्व टिकवून ठेवतील, असे संकेत देत २०२५ हे बुलियनसाठी ऐतिहासिक वर्ष ठरले आहे.
भारतात गुंतवणूकदारांचा कल वाढतोय
उच्च दरांमुळे दागिन्यांची मागणी घटली असली तरी सोन्याच्या नाणी व बारमध्ये गुंतवणूक वाढली आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी (डी-डॉलरीकरण) हा कल असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. चीन आघाडीवर असून भारतही सातत्याने खरेदीदार राहिला.
२०२५ मध्ये विक्रमी दर :
सोने : ₹ १,४२,३०० / प्रति १० ग्रॅम (२६ डिसेंबर)
चांदी : ₹ २,४१,००० / प्रति किलो (३० डिसेंबर)
केंद्रीय बँकांचा कणा
जागतिक केंद्रीय बँका, त्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यासह, वर्षभर सोन्याच्या मोठ्या खरेदी करत राहिल्या.
२०२४ : १,०७० टन खरेदी
२०२५ : ७०० टनांहून अधिक खरेदीचा अंदाज
२०२५ हे फेडसाठी स्पष्ट वळणाचे वर्ष ठरले. विभाजित मतप्रवाह आणि राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर व्याजदर कपात करण्यात आली. पुरवठा तुटवड्यामुळे चांदी ‘स्टार परफॉर्मर’ ठरली. ही केवळ मागणीची बाब नाही; हा संरचनात्मक पुरवठा तुटवडा आहे. महागाईतील संघर्षात सोने महत्त्वाचे ठरते.