पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरु असताना अवैध दारू प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यावर पांघरूण घालण्यासाठी सहाही जणांचे मृतदेह प्रशासनाला न कळविताच जाळून टाकण्यात आले आहेत.
पश्चिम चंपारणच्या बेतियामध्ये ही घटना घडली आहे. या सर्वांनी विषारी दारूचे सेवन केले होते. प्रशासनाने अद्याप दारूमुळे या लोकांना मृत्यू झाल्याचे जाहीर केलेल नाही.
सर्व मृत हे मठिया या एकाच गावातील आहेत. लौरिया पोलिस स्टेशन हद्दीतील मठिया गावात ३५ वर्षीय प्रदीप गुप्ता यांचा गुरुवारी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर शनिवारी काही तासांतच एकामागून एक आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये काका आणि पुतण्यांचाही समावेश आहे. कुटुंबातील सदस्यांनी घाईघाईत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबाने याबद्दल पोलिसांना माहिती दिली नाही. एसडीएम सूर्यप्रकाश गुप्ता यांनी ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दम्यामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा अर्धांगवायूमुळे मृत्यू झाला. थंडीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.