Women's Day Special : स्मृती मंधानाचा जागतिक सन्मान; बार्बी वर्ल्डमध्ये स्थान मिळवणारी पहिली क्रिकेटपटू 
राष्ट्रीय

Women's Day Special : स्मृती मंधानाचा जागतिक सन्मान; बार्बी वर्ल्डमध्ये स्थान मिळवणारी पहिली क्रिकेटपटू

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधानाला मोठा जागतिक सन्मान मिळाला आहे. Mattel च्या Barbie Dream Team मध्ये तिची निवड झाली असून तिच्यासारखी दिसणारी खास Barbie Doll तयार करण्यात आली आहे.

Mayuri Gawade

'बार्बी' म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गुलाबी रंगाचे आकर्षक कपडे घातलेली, फॅशन आणि ग्लॅमरचे प्रतीक मानली जाणारी बाहुली उभी राहते. लहान मुलींपासून तरुणींपर्यंत अनेकांसाठी बार्बी म्हणजे स्वप्नवत जगाचं प्रतीक. मात्र काळ बदलत असताना बार्बीची ओळखही बदलत आहे. आता ती केवळ फॅशनपुरती मर्यादित न राहता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहे.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जगभरात विविध उपक्रम राबवले जातात. अशाच एका विशेष उपक्रमातून भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिला अनोखा जागतिक सन्मान मिळाला आहे. प्रसिद्ध खेळणी उत्पादक कंपनी मॅटेल (Mattel) ने जाहीर केलेल्या बार्बीच्या पहिल्या 'Barbie Dream Team'मध्ये तिची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्मृतीच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित तिच्यासारखी दिसणारी खास बार्बी डॉल तयार करण्यात आली असून असा सन्मान मिळवणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

महिला दिनापूर्वी मोठी घोषणा

५ मार्च रोजी मॅटेल कंपनीने ही घोषणा केली. दरवर्षी ८ मार्चला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांत अडथळे पार करत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि पुढील पिढीला प्रेरणा देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

स्मृतीवर आधारित तयार करण्यात आलेली ही बार्बी डॉल 'वन-ऑफ-अ-काइंड' (One-of-a-kind) स्वरूपातील आहे. ही डॉल व्यावसायिक विक्रीसाठी उपलब्ध नसून तिच्या कर्तृत्वाला दिलेली खास आदरांजली मानली जात आहे.

जागतिक प्रेरणादायी महिलांच्या यादीत स्थान

या 'ड्रीम टीम'मध्ये जगभरातील विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या आठ महिलांचा समावेश आहे. यामध्ये टेनिस दिग्गज आणि उद्योजिका सेरेना विल्यम्स, संशोधन अंतराळवीर केली गेरार्डी, मेक्सिकन रेसिंग ड्रायव्हर रेजिना सिर्व्हेंट, फुटबॉलपटू क्लो केली, जर्मन गायिका हेलेन फिशर, गिर्यारोहक झोजा स्कुबिस आणि ऑस्ट्रेलियन सर्फिंग चॅम्पियन स्टेफनी गिलमोर यांचा समावेश आहे.

मॅटेलच्या मते, आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी ही ‘ड्रीम टीम’ तयार करण्यात आली आहे.

महिला क्रिकेटला जागतिक ओळख

भारतीय महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्मृती मंधानाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ती आज जगातील आघाडीच्या महिला फलंदाजांपैकी एक मानली जाते. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये शतक झळकावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटूंमध्ये तिचे नाव विशेष उल्लेखनीय मानले जाते.

मैदानावरील तिची आक्रमक फलंदाजी आणि मैदानाबाहेरील साधेपणा यामुळे ती अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

स्मृती मंधानाची प्रतिक्रिया

या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना स्मृती मंधानाने सोशल मीडियावर तिच्या खास बार्बी डॉलचे फोटो शेअर केले. हा क्षण अजूनही स्वतःला विश्वास बसत नसल्यासारखा वाटत असल्याचे तिने सांगितले. "माझ्या प्रवासातून प्रेरित होऊन तयार झालेली बार्बी डॉल पाहणे हा अतिशय वेगळा आणि भावनिक अनुभव आहे. लहानपणी मी याची कधी कल्पनाही केली नव्हती," असे स्मृतीने म्हटले.

तिने पुढे सांगितले की, तिची कहाणी पाहून अनेक लहान मुलींना क्रिकेटच्या मैदानावर मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल, अशी तिला आशा आहे. तसेच विविध क्षेत्रातील प्रेरणादायी महिलांसोबत 'Barbie Dream Team'मध्ये स्थान मिळणे हा मोठा सन्मान असल्याचेही तिने नमूद केले.

महिला दिनाच्या उंबरठ्यावर मिळालेला हा सन्मान केवळ स्मृती मंधानासाठीच नव्हे, तर मोठी स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Iran-US-Israel युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी 'आवश्यक वस्तू कायदा' लागू, जाणून घ्या अर्थ

मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video

रस्ते अपघातांमुळे ५८ बसचालक बडतर्फ; २०२२ ते २०२४ दरम्यानच्या अपघातांमुळे कारवाई; उपमुख्यमंत्री शिंदेंची विधान परिषदेत माहिती

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; Akasa Air च्या वेळापत्रकात बदल, जेद्दाहसाठी उड्डाणे सुरू तर काही शहरांतील सेवा बंद