नवी दिल्ली : केंद्र सरकारने साबण, शाम्पू आणि टूथपेस्ट यांसारख्या सौंदर्यप्रसाधने व दैनंदिन वापरातील टॉयलेट्रीज उत्पादनांच्या पॅकेजिंगबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे ही उत्पादने शाकाहारी आहेत की मांसाहारी घटकांपासून बनवली आहेत, हे ग्राहकांना स्पष्टपणे कळावे यासाठी पॅकिंगवर विशिष्ट चिन्ह देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
शाकाहारी घटकांपासून बनवलेल्या उत्पादनांवर हिरवा ठिपका असेल, तर मांसाहारी घटकांचा वापर झालेल्या उत्पादनांवर लाल किंवा तपकिरी ठिपका छापणे बंधनकारक राहील. हे चिन्ह पॅकेटच्या मुख्य दर्शनी भागावर अगदी वरच्या बाजूस स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी असणे आवश्यक आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 'लीगल मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम, २०११' मध्ये सुधारणा करून ही नवी नियमावली लागू केली आहे.
यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून हे नवे नियम सोमवारपासून लागू झाले आहेत. या निर्णयामुळे आता दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करताना ग्राहकांना त्यातील घटकांची माहिती पॅकिंगवरील हिरव्या किंवा लाल/तपकिरी टिपक्यावरून थेट ओळखता येईल.