सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गेल्या २६ दिवसांपासूनचे आपले उपोषण गुरुवारी रात्री समाप्त केले. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पत्नी गीतांजली आंगमो, केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी फळांचा रस घेऊन उपोषण संपवले. उपोषण संपले तरी आता सरकारची जबाबदारी सुरू झाली आहे, असे वांगचुक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वांगचुक यांनी उपोषण मागे घेताना आंदोलनाचे नेते हजर नव्हते. तसेच त्यांनी आपल्या अंतिम मागण्यांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा उल्लेख वगळला. यामुळे आंदोलनात फूट पडल्याची व सरकारने वांगचुक यांना आंदोलकांपासून वेगळे केल्याची चर्चा सुरू झाली.
सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण मागे घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, "हे आंदोलन केवळ सोनम वांगचुक किंवा माझे नाही. हे देशातील युवकांचे आंदोलन आहे. सरकारला हा प्रश्न सोडवायचा असेल, तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणे हाच एकमेव मार्ग आहे," याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
केंद्र सरकार आणि सर्वपक्षीय खासदारांकडून महत्त्वाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासने मिळाल्यानंतर आपण हा निर्णय घेतला असे वांगचुक यांनी शुक्रवारी एक्स वरच्या आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले. सरकारने संसदेत परीक्षा प्रणालीतील त्रुटी, प्रश्नपत्रिका फुटी आणि शैक्षणिक सुधारणांवर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना योग्य नुकसानभरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय, दिल्लीतील जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या तसेच २० जुलै रोजी संसद मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी व युवकांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, असेही सरकारने आश्वासन दिले अशी माहितीही वांगचुक यांनी दिली.
वांगचुक नजरकैदेत होते- दीपके
आजवर आंदोलनाचा चेहरा असलेले वांगचुक यांचे उपोषण अचानक, गुपचूपरीत्या का संपवण्यात आले व यावेळी आंदोलनाचे नेते का हजर नव्हते याबाबत सोशल मिडियात चर्चा सुरु झाल्या. आपल्याला वांगचुक यांना भेटू दिले गेले नाही असा दावा दीपके यांनी केला. "सरकारने सोनम वांगचुक यांना जणू नजरकैदेतच ठेवले होते. जे. पी. नड्डा त्यांना भेटू शकले, पण विरोधी पक्षातील कोणत्याही खासदाराला त्यांची भेट घेता आली नाही. आम्हालाही भेटण्याची परवानगी नव्हती. त्यांनी उपोषण मागे घेतल्याचा मला आनंद आहे," असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.