राष्ट्रीय

'त्यांनी वैयक्तिक जीवनात, पत्नीशी वागण्यात...' ; राममंदिर उद्घाटनाआधी सुब्रमण्यम स्वामींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Swapnil S

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा अयोध्येतील ऐतिहासिक राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल सुरूच आहे. आज राम मंदिर उद्घाटनाच्या काही तास आधी स्वामींनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 'मोदींनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात, विशेषतः त्यांच्या पत्नीशी वागण्यातही कधी भगवान रामाचे अनुसरण केले नाही', अशी टीका स्वामी यांनी केली आहे.

"मोदी प्राणप्रतिष्ठा पूजेत सहभागी झालेत, जेव्हा पूजेमध्ये त्यांचा पंतप्रधान म्हणून दर्जा शून्य आहे...त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात विशेषतः त्यांच्या पत्नीशी वागण्यात भगवान रामाचे अनुसरण केले नाही, किंवा त्यांनी गेल्या दशकात पंतप्रधान म्हणून रामराज्याप्रमाणे कामही केले नाही", अशी बोचरी टीका स्वामी यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे केली.

यापूर्वी, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामाणिक असतील तर त्यांनी राम सेतूला राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून घोषित करावे. हे प्रकरण 10 वर्षांपासून प्रलंबित आहे, असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते. सुब्रमण्यम स्वामी यांनी याआधीही राम मंदिराबाबत मोदींना दिले जात असलेल्या एकतर्फी श्रेयावरूनही टीका केली होती.

दरम्यान, आज (दि.22) दुपारी 12.29 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हा हेलिकॉप्टरमधून पृष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली होती. पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासह संत समाज आणि प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत राम लल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पूर्ण झाला. आज दिवसभर हा सोहळा सुरू असणार असून सोहळ्यानंतर देशभरातील रामभक्तांना प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. सोहळ्याची सांगता झाल्यानंतर बुधवार (24 जानेवारी 2024) पासून राम मंदिर सर्व रामभक्तांसाठी खुले होणार आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त