नवी दिल्ली : सुप्रीम कोर्ट व सरन्यायाधीशांविरोधात वक्तव्य करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही, असे सुप्रीम कोर्टाने सोमवारी स्पष्ट केले.
खासदार दुबे यांनी सुप्रीम कोर्टाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे देशात खळबळ माजली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तेव्हा वकिलाने सांगितले की, या कोर्टाविरोधात व सरन्यायाधीशांविरोधात वक्तव्ये केली जात आहेत.
त्यावर न्या. बी. आर. गवई म्हणाले की, तुम्हाला काय करायचे आहे? त्यावर वकिलाने सांगितले की, मी अवमान खटला दाखल करू इच्छितो. त्यावर न्या. गवई म्हणाले की, तुम्ही ते दाखल करू शकता.आमच्या परवानगीची गरज नाही. तुम्हाला महाधिवक्त्यांच्या परवानगीची गरज लागेल.
दुबेंविरोधात सरन्यायाधीशांना पत्र
यापूर्वी वकील नरेंद्र मिश्रा यांनी सरन्यायाधीश व सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून निशिकांत दुबे यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. दुबे यांनी कोर्टाविरोधात केलेले सार्वजनिक वक्तव्य अपमानजनक व भडकाऊ आहेत. ही वक्तव्ये न्यायपालिकेला घाबरवणारी, राज्यघटनेचे संरक्षण करणाऱ्या संस्थाची बदनामी करणारी आहेत, असे पत्रात नमूद केले होते.