नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरील खटल्यात कोर्टाच्या आदेशांचे राज्यांनी पालन केले नाही. यामुळे संतप्त झालेल्या सुप्रीम कोर्टाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना ३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश शुकवारी दिले.
सर्वोच्च न्यायालयाने २२ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशाचे पालन का झाले नाही, याबाबत पश्चिम बंगाल आणि तेलंगणाव्यतिरिक्त सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांनी ३ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित रहावे आणि प्रतिज्ञापत्र का सादर केले गेले नाही, याचे स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश कोर्टाने दिले.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. २७ ऑक्टोबरपर्यंत पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) यांच्याशिवाय इतर कोणत्याही राज्याने प्रतिज्ञापत्र दाखल केले नव्हते. न्यायालयाने राज्यांकडून प्राण्यांच्या जन्म नियंत्रण (एबीसी) नियमांबाबत माहिती मागवली होती.