नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आपल्या न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्यानुसार सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह ३३ न्यायाधीशांपैकी २१ न्यायाधीशांनी आपल्याकडील संपत्तीची माहिती अधिकृतपणे वेबसाइटवर अपलोड केली आहे. इतर १२ न्यायाधीशांची माहितीही लवकरच सार्वजनिक केली जाणार आहे.
देशात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती जगजाहीर करण्यात आली आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या आवारातून नुकतीच मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त झाल्यानंतर वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मावळते सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे दक्षिण दिल्लीत तीन बेडरूमचा डीडीए फ्लॅट आहे. दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये चार बेडरूम फ्लॅट (२,४४६ चौरस फूट) आणि दोन पार्किंग स्पेस आहेत. गुरुग्राममधील सिसपाल विहार येथील सेक्टर ४९ मधील चार बेडरूमच्या फ्लॅटमध्ये (२०१६ चौरस फूट) त्यांची ५६% भागिदारी आहे. हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथील वडिलोपार्जित मालमत्तेतही त्यांचा वाटा आहे. सरन्यायाधीशांकडे एकूण ५५.७५ लाख एफडी आणि बँक खात्यांमध्ये १.०६ कोटी पीपीएफमध्ये, १.७७ कोटी जीपीएफमध्ये आणि एलआयसी मनी बॅक पॉलिसी आहे ज्याचा वार्षिक प्रीमियम २९,६२५ आहे. त्यांच्याकडे १४,००० रुपये शेअर्स, २५० ग्रॅम सोने आणि २ किलो चांदी आहे. तसेच २०१५ मॉडेलची मारुती स्विफ्ट कारदेखील आहे.
भावी सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांच्या बँकेत १९.६३ लाख रुपये जमा असून अमरावतीमध्ये वडिलोपार्जित घर आहे. तसेच मुंबईतील वांद्रे आणि दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये फ्लॅट आहेत. त्याचबरोबर अमरावती आणि नागपूरमध्ये शेतजमीन आहे. १४ मे रोजी ते सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेणार असून गवई यांच्याकडे ५.२५ लाखांचे सोन्याचे दागिने तसेच त्यांच्या पत्नीकडे २९.७० लाखांची ज्वेलरी आणि ६१,३२० रुपयांची रोख रक्कम आहे.