नवी दिल्ली : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करून घेण्यास शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिले.
हाथरससारख्या घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत, परंतु अशा प्रकारच्या याचिकांसाठी उच्च न्यायालये सक्षम आहेत, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले आहे. पीठाने याचिकाकर्त्याला अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आणि ही जनहित याचिका निकाली काढली.
चेंगराचेंगरीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या तज्ज्ञ समितीची स्थापना करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.