सोशल मीडियावर ओळख, नंतर प्रेमसंबंध, त्यातून शारीरिक संबंध आणि शेवटी फसवणूक अशा घटना अलीकडच्या काळात वाढत आहेत. लग्नाचं आश्वासन देऊन नंतर बलात्काराच्या अशाच एका खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन कायम तर ठेवलाच शिवाय आरोप करणाऱ्या महिलेला चांगलेच फटकारले.
बिहारमधील एका विवाहित महिलेने अंकित बर्नवाल या व्यक्तीवर लग्नाचे खोटे आश्वासन देत बलात्कार केल्याचा आरोप करत त्याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र, न्यायालयाने बुधवारी (१६ जुलै) ही याचिका फेटाळताना स्पष्ट केलं की, महिलेचं स्वतःचं वर्तनही कायद्यानुसार विचारात घेतलं जाईल. विशेषतः ती एक विवाहित महिला असूनही दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवत असल्यास तिच्यावरही खटला चालवला जाऊ शकतो.
विवाहबाह्य संबंध ठेवून तू देखील गुन्हा केलाय
न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं की, तू विवाहित आहेस, दोन मुलांची आई आहेस आणि परिपक्वही आहेस. तू विवाहित असूनही कोणत्या नात्यात अडकत आहेस याची तुला पूर्ण जाणीव होती. महिलेच्या वकिलाने सांगितलं, की बर्नवालने अनेक वेळा हॉटेल्स आणि रेस्टहाऊसला बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यावर न्यायालयाने संतप्त प्रतिक्रिया देत महिलेला विचारलं ,तू त्याच्या सांगण्यावरून वारंवार हॉटेल्समध्ये का जात होतीस? तुला हे चांगलंच माहीत आहे, की विवाहित असूनही विवाहबाह्य संबंध ठेवून तू देखील गुन्हा केला आहेस.
संबंधित महिला आणि बर्नवाल यांची ओळख २०१६ मध्ये सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर दोघांचे संबंध वाढले. महिलेने आरोप केला की, बर्नवालच्या दबावामुळे तिने पतीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या पंधरा दिवसांतच तिने बर्नवालला लग्न करण्यास सांगितले. पण, त्याने नकार दिला. त्यामुळे महिलेने बिहार पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल केली.
घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्यात कोणतेही शारीरिक संबंध झाले नाहीत, यामुळे पटना उच्च न्यायालयाने बर्नवालला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनचा निर्णय कायम ठेवला आहे.