राष्ट्रीय

दिल्लीतील आश्रमात मुलींचा लैंगिक छळ; गुन्हा दाखल होताच स्वामी चैतन्यानंद फरार, १७ विद्यार्थिनींनी केली तक्रार

राजधानी दिल्लीत धर्माच्या नावाखाली काळे धंदे करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाची काळी कृत्ये उजेडात आली आहेत. एका आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी आश्रमातील अवैध प्रकार उघडकीस आणले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत धर्माच्या नावाखाली काळे धंदे करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाची काळी कृत्ये उजेडात आली आहेत. एका आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी आश्रमातील अवैध प्रकार उघडकीस आणले आहेत. वसंत कुंज परिसरातील एका प्रसिद्ध आश्रमाचा प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी नावाच्या बाबावर महिलांशी गैरवर्तन, छेडछाडीचे आरोप करण्यात आले आहेत. १७ विद्यार्थिनींनी या बाबावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. त्यानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी फरार झाला आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार विद्यार्थिनींनी पार्थसारथीवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या पीडित विद्यार्थिनी दिल्लीतील मॅनेजमेंट इन्स्टिट्युटमध्ये शिकत आहेत. या विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पार्थसारथीविरोधात तपास करण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, एकूण ३२ विद्यार्थिनींनी पार्थसारथीविरोधात तक्रार दाखल केली असून त्यापैकी १७ मुलींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या मुलींनी लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे. चैतन्यानंद त्यांना अश्लील संदेश पाठवत होता, त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलत होता, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता, असे या मुलींनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पार्थसारथीविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे.

शोधमोहीम सुरू

विद्यार्थिनींनी तक्रार केली आहे की आश्रमातील महिला शिक्षिका, कर्मचारी व वॉर्डन बाबाच्या आदेशांचे पालन करण्यास सांगत होते. अनेकदा बाबा सांगेल तसे करावे यासाठी दबाव टाकला जात होता. या सर्वांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्यात पार्थसारथीविरोधात लैंगिक छळ व बलात्काराशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पार्थसारथीला पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे.

‘यूएन’ची नंबरप्लेट

पोलिसांनी पार्थसारथीची आलिशान कार जप्त केली आहे. या कारवर संयुक्त राष्ट्राची बनावट नंबर प्लेट लावण्यात आली आहे. पोलीस तपासात उघड झाले आहे की, संयुक्त राष्ट्राकडून असा कोणताही नंबर जारी करण्यात आलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून सीसीटीव्ही फुटेज, इतर डिजिटल डिव्हाइसेस, एनव्हीआर व हार्ड डिस्क्स जप्त केले आहेत. हे सर्व पुरावे फॉरेन्सिक टीमकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती

राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा