नवी दिल्ली : देशातील दिग्गज माहिती तंत्रज्ञान कंपनी ‘टीसीएस’ १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. हे प्रमाण कर्मचाऱ्यांच्या एकूण प्रमाणाच्या २ टक्के आहे. ही कर्मचारी कपात पुढील वर्षापासून होऊ शकते.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) के. कृतिवासन यांनी सांगितले की, तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बदलांमुळे आपल्याला तत्पर व भविष्यासाठी तयार राहण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. एआय व ऑपरेटिंग मॉडेलच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये आम्ही जात आहोत. आम्ही काम करण्याची पद्धत बदलत आहोत. आम्हाला स्वत:ला बदलावे लागत असून आम्ही मोठ्या प्रमाणावर ‘एआय’चे प्रयोग करत आहोत. भविष्यात आम्हाला ज्या कौशल्याची गरज असेल, त्यासाठी आम्ही कौशल्याचे मूल्यांकन करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या करिअरमध्ये वाढीसाठी मोठी गुंतवणूक केली. तरीही भविष्यात आम्हाला अनेक कामांची गरज लागणार नाही. त्यामुळे कंपनीच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या दोन टक्के हिश्श्यावर परिणाम होईल. सीईओ म्हणून हा माझ्यासाठी कठीण निर्णय असेल. या निर्णयाचा फटका मध्य व वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना बसणार आहे, असे ते म्हणाले.
‘टीसीएस’मध्ये सध्या ६ लाख १३ हजार कर्मचारी आहेत. त्यातील दोन टक्के म्हणजे १२ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवण्यात येणार आहे. हा कठीण निर्णय आहे. पण, टीसीएससाठी आम्हाला हे निर्णय घ्यावे लागतील, असे त्यांनी सांगितले.