चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे सर्वेसर्वा थलपती विजय यांनी रविवारी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईतील राजभवनात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांनी राज्याचे ९वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी राज्यातील हजारो समर्थकांनी चेन्नईत जल्लोष साजरा केला. त्यांनी तमिळ भाषेत शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यादरम्यान राहुल गांधी देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री होताच, विजय यांनी तत्काळ कामाला सुरुवात केली आणि कागदपत्रांच्या पहिल्या संचावर स्वाक्षरी केली. या आदेशांमध्ये राज्यातील जनतेला २०० युनिट्स मोफत वीज, महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि अमली पदार्थांविरोधात कारवाई यांसारख्या तरतुदींचा समावेश आहे.
शपथविधीदरम्यान घडली अनपेक्षित घटना
मात्र, शपथविधी दरम्यान एका अनपेक्षित घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोहळा सुरू असताना, राज्यपाल यांनी विजय यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ पूर्ण होताच विजय यांनी आपल्या खिशातून एक कागद काढला आणि उपस्थित समर्थकांना संबोधित करण्यासाठी भाषण देण्यास सुरुवात केली. त्यावेळी राज्यपाल अर्लेकर यांनी त्यांना थांबवले आणि केवळ लेखी स्वरूपात उपलब्ध करून दिलेला मजकूरच वाचण्याची सूचना दिली. राज्यपालांनी स्पष्ट केले की, ‘हा केवळ घटनात्मक शपथविधीचा सोहळा आहे, राजकीय भाषणासाठी हे व्यासपीठ नाही’.
राज्यपालांच्या सूचनेचा विजय यांनी राखला मान
विजय यांनी राजकीय भूमिका मांडण्यास सुरुवात केली, राज्यपालांच्या या हस्तक्षेपामुळे काही काळ परिसरात शांतता पसरली होती. राज्यपालांच्या सूचनेचा मान राखत विजय यांनी आपले भाषण थांबवले आणि औपचारिकता पूर्ण केली. चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या विजय यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. त्यांच्या पक्षाच्या विजयानंतर तामिळनाडूच्या राजकारणात एका मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत.
राज्यपालांनी घेतली खबरदारी
राज शिष्टाचारानुसार, शपथविधी सोहळ्यात केवळ विहित नमुन्यातील शपथ वाचली जाते. त्यानंतर होणारे भाषण हे सहसा सभागृहात किंवा जाहीर सभेत होणे अपेक्षित असते, त्यामुळेच राज्यपालांनी ही खबरदारी घेतली. विजय आता मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात कशी करतात आणि तामिळनाडूच्या विकासासाठी कोणती पावले उचलतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
विजय यांच्यासोबत नऊ मंत्र्यांनी घेतली शपथ
विजय यांच्यासोबत आणखी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये एन. आनंद, अधव अर्जुन, डॉ. के.जी.अरुणराज, के.ए. सेनगोट्टैयन, पी. वेंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी.के. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्तना यांचा समावेश आहे. हे सर्व आमदार विजय यांच्या 'टीव्हीके' या पक्षाचे सदस्य आहेत. सद्यस्थितीत, विजय यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात आघाडीतील मित्रपक्षांच्या एकाही आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही.
संविधानाविषयी खरी श्रद्धा, निष्ठा बाळगेन
शपथ घेताना, विजय म्हणाले…‘मी, सी. जोसेफ विजय, भारताच्या संविधानाविषयी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून, मी भारताची एकता आणि अखंडता अबाधित राखेन; तसेच, मी माझ्या कर्तव्यांचे पालन करेन आणि माझ्या सदसद्विवेकबुद्धीनुसार व कायद्याला अनुसरून वागेन. मी कोणालाही घाबरणार नाही, तसेच कोणत्याही एकतर्फी आदेशांपुढे झुकणार नाही. मी सर्व लोकांना न्याय देईन’.
अभिनेता विजय इनडोअर स्टेडियममध्ये राहुल गांधींसोबत बसले. काँग्रेस पक्षाने यापूर्वीच टीव्हीके सोबत युती केली आहे. मुख्यमंत्री विजय यांनी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या लोकांचे हात जोडून आभार मानले. मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांनी कागदपत्रांच्या पहिल्या संचावर स्वाक्षरी केली.
नवीन पटनायक यांनी विजय यांचे अभिनंदन केले
बिजू जनता दलचे प्रमुख नवीन पटनायक यांनी विजय मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले, "विजय मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला आशा आहे की नवीन नेतृत्वाखाली तामिळनाडू अधिक उंची गाठेल आणि जलद विकास साधेल’. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विजय पहिल्यांदाच सचिवालयात दाखल झाले, जिथे पोलिसांनी त्यांना औपचारिक मानवंदना दिली.
जनतेची फसवणूक कधीही करणार नाही...
आपल्या उद्घाटनपर भाषणात मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट केले की, आपला जन्म कोणत्याही राजघराण्यात झालेला नाही; उलट, जनतेनेच स्वतःहून आपले स्वागत केले आणि आपल्याला आपलेसे केले. त्यामुळे, खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक कधीही करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली. मागील द्रमुक सरकारने राज्यावर १० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा लादल्याचा आरोप मुख्यमंत्री विजय यांनी केला.
विजय यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि भविष्यातील प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी राज्याच्या आर्थिक स्थितीवर आधारित एक 'श्वेतपत्रिका' प्रकाशित केली जाईल. आमच्या कामाद्वारे आमची क्षमता सिद्ध करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ द्या. अमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. जनतेचा एकही पैसा हडप केला जाणार नाही. विजय यांच्याव्यतिरिक्त सत्तेचे दुसरे कोणतेही केंद्र असणार नाही; केवळ विजय हेच सत्तेचे एकमेव केंद्र असतील. शासनाची एक नवी व्यवस्था सुरू केली जात आहे, एक नवे पर्व जे प्रामाणिकपणा, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे असेल. तसेच सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या पक्षाला पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री विजय यांनी काँग्रेस, व्हीसीके आणि डाव्या पक्षांचे जाहीर आभार मानले.