नवी दिल्ली : निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळून सरकारला निवडणूक आयोगावर नियंत्रण हवे असून, आयोगाची विश्वासार्हता अबाधित ठेवायची नाही हेच स्पष्ट होते, अशी टीका काँग्रेसने सोमवारी केली. याप्रकरणी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात १९ फेब्रुवारी रोजी सुनावणी होत नाही तोपर्यंत नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड पुढे ढकलावी, अशी सूचनाही काँग्रेसने सरकारला केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची सोमवारी नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांचे नाव निश्चित करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्तांचे नाव निश्चित करण्यात आले असून त्यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेसने निवड समितीच्या सदस्यांची बैठक आटोपल्यानंतर ही निवड पुढे ढकलावी, अशी सूचना केली आहे. निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळून सरकारला आयोगावर नियंत्रण ठेवायचे असून, आयोगाची विश्वासार्हता अबाधित ठेवायची नसल्याचेचे स्पष्ट होते, असे काँग्रेसचे नेते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी सोमवारी झालेल्या बैठकील हजर होते, तरी सिंघवी यांनी बैठकीत काय झाले ते जाहीर केले नाही.