नवी दिल्ली : जगभरातील प्रदूषणाविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या ताज्या अहवालानुसार भारताच्या स्थितीत विशेष फरक पडला नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. जगातील २० सर्वात प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतातील असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राजधानी दिल्ली जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे.
प्रदूषित शहरांमध्ये आसाममधील ‘बर्निहाट’ शीर्षस्थानी आहे. ‘स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी आयक्यूआर’च्या जागतिक एअर क्वालिटी रिपोर्ट २०२४ नुसार दिल्ली जागतिक स्तरावर सगळ्यात प्रदूषित राजधानीचे शहर ठरले आहे, तर भारत हा जगातील पाचवा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे. २०२३ मध्ये भारताचे स्थान तिसऱ्या क्रमांकावर होते.
अहवालानुसार, २०२३ मध्ये ५४.४ मायक्रोग्राम प्रति घनमीटरच्या तुलनेमध्ये २०२४ मध्ये भारतात पीएम २.५ चे प्रमाण ७ टक्क्यांनी कमी होऊन सरासरी ५.६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होईल, असा अंदाज आहे. असे असले तरी जगातील १० प्रदूषित शहरांपैकी सहा सर्वाधिक प्रदूषित शहरे भारतातच आहेत.
दिल्ली शहराच्या प्रदूषणाचा स्तर सातत्याने उंचावत गेलेला आहे. वार्षिक सरासरीनुसार पीएम २.५ सांद्रता प्रति घटमीटर ९१.६ मायक्रोग्रॅम इतकी आहे. जी २०२३ मध्ये प्रति घनमीटर ९२.७ मायक्रोग्रॅम इतकी होती. जगातील सर्वात २० प्रदूषित शहरांमध्ये १३ भारतीय शहरे असून त्यामध्ये बर्निहाट, दिल्ली, मुल्लानपूर, फरिदाबाद, लोणी, नवी दिल्ली, गुरगाव, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवाडी, मुझफ्फरपूर, हनुमानगड आणि नोएडा या शहरांचा समावेश आहे.
वयोमानामध्ये घट, मृत्यूचे प्रमाण वाढले
भारतीय शहरांमध्ये ३५ टक्के वार्षिक पीएम २.५ पातळी ही ‘डब्ल्यूएचओ’च्या ५ मायक्रोग्राम प्रति घनमीटर मर्यादेपेक्षा १० पट जास्त आढळून आली. भारतातील वायू प्रदूषणामुळे देशवासीयांचे वयोमान ५.२ वर्षांनी घटलेले आहे. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ अभ्यासानुसार, २००९ ते २०१९ पर्यंत भारतामध्ये दरवर्षी सुमारे १५ लाख लोकांचे मृत्यू हे प्रदूषणामुळे झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.