राष्ट्रीय

कोकणचे सुपुत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणार

वृत्तसंस्था

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सिंधुदुर्गातील देवगड येथील उदय लळीत आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी ते भारताचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ए. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ते देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे.

वकिली व्यवसाय असलेल्या घरातच उदय लळीत यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील वकिली करायचे. एवढेच नव्हे, तर त्याकाळी डॉक्टर बनलेल्या अगदी मोजक्या स्त्रियांमध्ये त्यांच्या आजीचा समावेश होतो. त्या एलपीपीएस डॉक्टर होत्या. न्यायमूर्ती उदय लळीत यांचे वडील अॅड. उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. त्यामुळे उदय लळीत यांचे संपूर्ण शिक्षण मुंबईत झाले. १९८३पासून उदय लळीत यांनी वकिलीला सुरुवात केली. काही वर्षे दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे काम केल्यानंतर ते दिल्लीला गेले. ज्येष्ठ विधितज्ज्ञ सोली सोराबाजी यांचे ते सहा वर्षे निकटचे सहकारी होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्यांनी स्वतंत्रपणे वकिलीही केली. उदय लळीत यांनी आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली असली तरीही ते प्रसिद्धीझोतापासून दूर राहिले. २-जी स्पेक्ट्रम हा सर्वांत मोठा भ्रष्टाचार घोटाळा लळीत यांनीच चालवला होता.

घराण्यात पिढीजात वकिली

विजयदुर्गजवळ असलेले गिर्ये हे न्यायाधीश उदय लळीत यांचे मूळ गाव आहे. आजही आठ ते १० लळीत कुटुंबे या गावात वास्तव्य करत आहेत.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात आतापर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

पवार विरुद्ध पवार; पुण्यातील लढतीकडे देशाचे लक्ष

'मुंबई दंगली'प्रकरणी निर्देशांची अंमलबजावणी करा; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! आज अनेक भागांत पाणीकपात; वीजपुरवठा खंडित, जलशुद्धीकरण यंत्रणा ठप्प

समीर वानखेडेंना तूर्तास हायकोर्टाचा दिलासा कायम; सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण