नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळा मनी लाँड्रिंगप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना जामीन मंजूर केला. सिंह यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र ईडीने त्याला विरोध केला. सिंह यांनी लाच स्वीकारली होती आणि इतर संबंधितांसमवेत कट रचून त्यांनी या घोटाळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, असा दावा ईडीने केला होता. संजय सिंह सहा महिन्यांपासून कारागृहात आहेत, सिंह यांच्या कोठडीला मुदतवाढ देणे गरजेचे आहे का, याबाबत संबंधितांकडून सूचना घ्याव्यात, असे पीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांना सांगितले.
सिंह यांच्याकडे कोणतीही रक्कम सापडली नाही आणि त्यांनी दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावर सुनावणीदरम्यान चर्चा होऊ शकते, असेही पीठाने म्हटले आहे. न्या. संजीन खन्ना, न्या. दीपांकर दत्त आणि न्या. पी. बी. वराळे यांच्या पीठाने संजय सिंह यांची सुटका करण्याचे आदेश जारी केले. संजय सिंह गेल्या सहा महिन्यांपासून कारागृहात होते. या प्रकरणी संजय सिंह यांना जामीन मंजूर करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) स्पष्ट केल्यानंतर आपच्या नेत्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
भाजपकडून इन्कार
दरम्यान, दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेव यांनी आतिशी यांचा दावा फेटाळला असून त्या खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण आम आदमी पार्टी मद्य घोटाळ्यात सहभागी आहे आणि पुढील बळीचा बकरा कोण यावरून त्यांच्यातच अंतर्गत तंटे सुरू आहेत, असा दावा सचदेव यांनी केला आहे. येत्या काही दिवसांत सक्तवसुली संचालनालयामार्फत आपल्या आणि नातेवाईकांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात येतील, त्यानंतर समन्स बचावले जाईल आणि अटक केली जाईल, असे सांगण्यात आल्याचे आतिशी म्हणाल्या.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देण्याची गरजच नाही. कारण त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही किंवा मद्य धोरण घोटाळ्यात त्यांना दोषीही ठरविण्यात आलेले नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे दिल्ली विधानसभेत त्यांच्याकडे बहुमत आहे, असेही आतिशी म्हणाल्या. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर मुख्यमंत्र्यांना कारागृहात टाकून सरकार उलथून टाकण्याच्या सोप्या पद्धतीचा भाजप सातत्याने वापर करील. केजरीवाल यांनाच केवळ कारागृहात डांबून उपयोग नाही याची जाणीव झाल्याने आता ते दुसऱ्या फळीतील नेत्यांकडे वळले आहेत, असेही आतिशी म्हणाल्या.
लोकशाहीसाठी मोठा दिवस, 'सत्यमेव जयते' - आप
देशातील लोकशाहीसाठी हा मोठा दिवस आहे आणि आनंदाचा, आशेचा क्षण आहे, सत्यमेव जयते, असे आपचे नेते अतिशी आणि सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे. संपूर्ण मद्य घोटाळा माफीच्या साक्षीदारांच्या जबानीवर आधारित आहे. त्यांना जबरदस्तीने केजरीवाल यांच्याविरुद्ध जबानी देण्यास भाग पाडण्यात आल्याचे न्यायालयाच्या आदेशाने उघड झाले आहे, असेही आपने म्हटले आहे. या घोटाळ्यात पैशांची देवाणघेवाण झाली आहे का, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली तेव्हा त्यावर ईडीकडे उत्तर नव्हते आणि ईडीचे प्रकरण केवळ माफीच्या साक्षीदारांवरच अवलंबून असल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपने धमकावल्याचा अतिशी यांचा दावा
भारतीय जनता पक्षात प्रवेश करा अथवा एका महिन्यात ईडीकडून होणाऱ्या अटकेला सामोरे जा, असा धमकीवजा संदेश भाजपकडून आल्याचा दावा दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी मंगळवारी येथे केल्याने खळबळ माजली आहे. आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून हा संदेश आपल्याकडे पोहोचविण्यात आला. आपल्यासह दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज, आमदार दुर्गेश पाठक आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याचे अतिशी यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.