हा आठवडा निर्णायक! शेअर बाजाराची नेमकी दिशा ठरणार; सोने-चांदी दराची कसोटी लागणार 'एआय'ने बनविलेली प्रतिमा
राष्ट्रीय

हा आठवडा निर्णायक! शेअर बाजाराची नेमकी दिशा ठरणार; सोने-चांदी दराची कसोटी लागणार

पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलाचे भाव आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा व्याजदराबाबतचा निर्णय या आठवड्यात शेअर बाजाराच्या हालचालींसाठी मुख्य घटक ठरतील, असे विश्लेषकांनी सांगितले आहे. याशिवाय, कंपन्यांचे त्रैमासिक आर्थिक निकाल देखील बाजारातील वातावरणावर प्रभाव टाकतील, असे ते म्हणाले.

Swapnil S

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलाचे भाव आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा व्याजदराबाबतचा निर्णय या आठवड्यात शेअर बाजाराच्या हालचालींसाठी मुख्य घटक ठरतील, असे विश्लेषकांनी सांगितले आहे. याशिवाय, कंपन्यांचे त्रैमासिक आर्थिक निकाल देखील बाजारातील वातावरणावर प्रभाव टाकतील, असे ते म्हणाले.

बाजारातील गुंतवणूकदार जून महिन्याच्या औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीवर नजर ठेवून असतील, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या आठवड्यात बीएसईचा निर्देशांक 'सेन्सेक्स' २,०९१.६८ अंकांनी म्हणजेच २.६७ टक्क्यांनी घसरला, तर एनएसईचा 'निफ्टी' ५६६.८५ अंकांनी म्हणजेच २.३२ टक्क्यांनी घसरून बंद झाला.

रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे वरिष्ठ संशोधन उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले, अमेरिका-इराण संघर्षाशी संबंधित घडामोडी, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील बदल जागतिक बाजारातील जोखीम ठरवणारे प्रमुख घटक राहतील. याव्यतिरिक्त, गुंतवणूकदार अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीवर बारकाईने लक्ष ठेवतील, जिथे व्याजदरांबाबतचे मार्गदर्शन आणि महागाईवरील वक्तव्ये जागतिक बाजारांसाठी अत्यंत महत्त्वाची असतील.

स्वास्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक प्रवेश गौर यांनी सांगितले की, या आठवड्यात आर्थिक निकाल जाहीर करणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये कोल इंडिया, बीईएल, लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, अदानी एंटरप्रायझेस, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, मारुती सुझुकी, आयटीसी आणि सन फार्मा यांचा समावेश आहे.

सोने-चांदी दराची कसोटी लागणार

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या बाजारासाठी आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचा व्याजाबाबतचा निर्णय, कच्च्या तेलाच्या किमतीतील बदल आणि अमेरिका-इराण तणाव या गोष्टींवर सोन्या-चांदीची सध्याची तेजी कायम राहील की त्यांच्यावर पुन्हा दबाव येईल, हे ठरणार असल्याचे विश्लेषकांनी सांगितले आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष कोर पर्सनल कन्झम्प्शन एक्स्पेंडिचर महागाईची आकडेवारी, साप्ताहिक बेरोजगारीचे दावे तसेच बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानच्या पतधोरण घोषणांवर असेल.

देशांतर्गत बाजारातील स्थिती

गेल्या आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर ऑगस्टच्या करारासाठी सोन्याचे भाव २,२०० रुपये म्हणजेच १.६ टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम १.४३ लाख रुपयांवर बंद झाले. सप्टेंबरच्या करारासाठी चांदीचे भाव ५,७३५ रुपये म्हणजेच २.७ टक्क्यांनी वाढून २.२२ लाख रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचले.

जागतिक बाजारातील स्थिती

न्यूयॉर्कमध्ये कॉमेक्सवर ऑगस्टच्या करारासाठी सोन्याचे वायदे ५२ डॉलर म्हणजेच १.३ टक्क्यांनी वाढून ४,०७०.८ डॉलर प्रति औंसवर बंद झाले, तर सप्टेंबरच्या करारासाठी चांदीचे भाव ३ डॉलर म्हणजेच जवळपास ५ टक्क्यांनी वाढून ५८.९० डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीपूर्वी मुंबई धूळ मुक्त; पालिकेची विशेष मोहीम, ९ दिवसांत प्रमुख रस्त्यांची स्वच्छता

मुंबईत वायूप्रदूषणाचे १२९ हॉटस्पॉट; ‘एम’ पूर्व वॉर्ड सर्वाधिक प्रदूषित; तर ‘जी’ दक्षिण वॉर्डमधील १८ ठिकाणांचा समावेश

Thane : मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा द्यावा; आमदार प्रताप सरनाईक यांचे मत

पुण्याच्या पीबीजीची ‘डुकाटी’सोबत हातमिळवणी; भारतीय सुपरक्रॉस रेसिंगमध्ये नवी दमदार एन्ट्री

Pune : सरसकट कर्जमाफी जाहीर करा; सुप्रिया सुळे यांची मागणी, उजनी डेटा सेंटरसह विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका