राष्ट्रीय

सांगलीतल्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या; शिक्षकाच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल, सुसाईड नोट लिहून संपवली जीवनयात्रा

“माझे नाव शौर्य पाटील आहे. आय एम व्हेरी सॉरी. आय डीड धीस. मला हे करावं लागत आहे. जर कोणाला गरज असेल तर माझे अवयव दान करा. माझ्या पालकांनी माझ्यासाठी खूप काही केलं..मला माफ करा. मी त्यांना...

Kishori Ubale

शिक्षकांच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण सध्या वाढताना दिसून येतंय. अशातच, आता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकेच्या छळाला कंटाळून दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली उडी मारून त्याने जीवन संपवले. या घटनेनंतर शाळेच्या आवारात विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन केले.

नेमकं काय घडलं?

शौर्य प्रदीप पाटील हा १६ वर्षीय विद्यार्थी मूळचा सांगलीच्या खानापूर जिल्ह्यातील ढवळेश्वरचा. तो दिल्लीच्या सेंट कोलंबस शाळेत इयत्ता दहावीत शिकत होता. शौर्य पाटील याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसायाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून नवी दिल्ली येथील राजीव नगर या भागात स्थायिक आहेत.

शौर्यने शाळेतील शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाइड नोटवरून समजते. त्याने मंगळवारी (दि.१८) राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली रस्त्यावर उडी मारून जीवन संपवले. शौर्यने आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला.

या घटनेनंतर दिल्लीतील राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शौर्यला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण, त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

माझे अवयव दान करा - शौर्य

शौर्यने आत्महत्यापूर्वी हिंदीत सुसाइड नोट लिहिली होती. त्याने म्हटलं, “माझे नाव शौर्य पाटील आहे. आय एम व्हेरी सॉरी. आय डीड धीस. मला हे करावं लागत आहे. जर कोणाला गरज असेल तर माझे अवयव दान करा. माझ्या पालकांनी माझ्यासाठी खूप काही केलं..मला माफ करा. मी त्यांना काही देऊ शकलो नाही. सॉरी मम्मी, मी तुझे शेवटचं मन तोडत आहे. शाळेतील शिक्षिकाच अशी आहे मी काय बोलणार?"

शौर्याच्या वडिलांचे शिक्षकांवर आरोप

शौर्यचे वडील प्रदीप पाटील कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. तेव्हा त्यांना ही दुर्दैवी बातमी समजली. त्यानंतर ते तातडीने दिल्लीला गेले. आज (दि. २०) शौर्य पाटील याच्यावर त्याच्या मूळगावी ढवळेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. "गेल्या अनेक दिवसांपासून शौर्य नाराज होता. मी शाळेत मीटिंगला गेलो की, शिक्षक म्हणायचे तुमचा मुलगा खोडकर आहे. आम्ही तुला टीसी देऊ, असं एक शिक्षकाने त्याला सांगितले होते. तेव्हापासून तो निराश होता", असे शौर्यच्या वडिलांनी सांगितले." असा प्रकार कोणासोबत घडू नये. माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे", अशी मागणी शौर्यच्या वडिलांकडून केली जातेय.

शौर्यला डान्सर व्हायचे होते पण...

शौर्यच्या मित्राने माध्यामांंना सांगितले, "तो बऱ्याच काळापासून समस्यांना तोंड देत होता. ही पहिलीच घटना नव्हती; अनेक विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती की सेंट कोलंबस शाळा चांगली नाही आणि शिक्षक कठोरपणे बोलतात. शौर्यला डान्सर व्हायचे होते आणि तो त्याचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी ड्रामा क्लबमध्ये सहभाग घ्यायचा. पण, शिक्षक त्याच्या अभिनयाला 'ओव्हरअ‍ॅक्टिंग' म्हणायचे आणि त्याचा अपमान करायचे."

शिक्षकांवर गुन्हा दाखल

सुसाइड नोटच्या आधारावर राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल तसेच मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या चार शिक्षिकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शाळेतील शिक्षकांच्या गैरवर्तनाबद्दलचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

पिकनिक ठरली शेवटची! ताम्हिणी घाटात भीषण अपघात; नवी कोरी थार कोसळली दरीत, ६ तरुणांचा मृत्यू

थोडा आगे हो! लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने वाद; चार-पाच जणांनी केली मारहाण, कल्याणच्या मराठी विद्यार्थ्याने संपवलं जीवन

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; राज्यपाल-राष्ट्रपतींना वेळमर्यादा नाही, 'तो' निर्णय ठरवला असंवैधानिक

'बाबा मला मारलं म्हणून कुणीतरी दिल्लीला...'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

नवरा, मुलगा किंवा मुलगी नसलेल्या महिलांनी खटले टाळण्यासाठी इच्छापत्र करावे ; सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन