राष्ट्रीय

तिरुपती मंदिर लाडू वाद; चार जणांना अटक

तिरुपती देवस्थानमध्ये प्रसादाच्या लाडूंमध्ये चरबीचे अंश सापडले होते. त्याप्रकरणी सीबीआयने चार जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Swapnil S

तिरुपती : तिरुपती देवस्थानमध्ये प्रसादाच्या लाडूंमध्ये चरबीचे अंश सापडले होते. त्याप्रकरणी सीबीआयने चार जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थानमध्ये प्रसादासाठी वाटण्यात येणाऱ्या लाडूवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या लाडूंसाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीचे अंश सापडल्यामुळे यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. राजकीय वर्तुळातदेखील यामुळे वातावरण तापले होते. या प्रकरणात जवळपास पाच महिन्यांनंतर पहिली अटकेची कारवाई करण्यात आली आहे. एकूण चार जणांना सीबीआयच्या विशेष तपास पथकाने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडीगुलमधील एआर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक आर. राजशेखरन, उत्तराखंडमधील भोले बाबा डेअरीचे विपीन जैन व पोमिल जैन, तर नेल्लोर येथील वैष्णवी डेअरीच्या अपूर्वा छावडा यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून या चौघांची चौकशी चालू आहे. या चौघांनाही तिरुपतीमधील स्थानिक न्यायालयात कोठडीसाठी हजर करण्यात आले होते. तिरुपती मंदिर प्रसादासाठी तूप पुरवठा करताना मोठा गैरव्यवहार झाल्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, कोठडीसाठी ‘एसआयटी’कडून सादर करण्यात आलेल्या अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली आहे. भोले बाबा ऑर्गेनिक डेअरी प्रायव्हेट लिमिटेड या पुरवठादाराला तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टने काळ्या यादीत टाकले होते.

काळ्या यादीत समावेश

रविवारी यासंदर्भातील रिमांड रिपोर्ट दाखल करण्यात आला. या अहवालानुसार, भोले बाबा डेअरीकडून २०१९ साली तिरुपती देवस्थानला २९१ रुपये प्रतिकिलो दराने तूप पुरवठा केला जात होता. २०२२ पर्यंत हा पुरवठा असाच चालू होता. दरम्यान, २०२२ मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थान समितीने भोले बाबा डेअरीच्या उत्पादन केंद्राची पाहणी केली. तिथली परिस्थिती समाधानकारक नव्हती, असा शेरा मारून देवस्थानने भोले बाबा डेअरीचा समावेश काळ्या यादीत केला. त्यामुळे भोले बाबा डेअरीला देवस्थानच्या नियमित कंत्राट प्रक्रियेत कंत्राट दाखल करणे अशक्य झाले. पण नंतर भोले बाबा डेअरीने इतर दोन कंपन्यांना कंत्राट प्रक्रियेत सर्व ‘सहकार्य’ करत पात्र ठरण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफारदेखील केली, असे अहवालात म्हटले आहे.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video