राष्ट्रीय

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

Toxic च्या प्री-रिलीज कार्यक्रमासाठी यशला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते मल्ला रेड्डी विद्यापीठात जमले होते...

किशोरी घायवट-उबाळे

हैदराबाद : अभिनेता यशच्या बहुप्रतीक्षित Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमादरम्यान शनिवारी (दि. २२) रात्री मल्ला रेड्डी विद्यापीठात दुर्घटना घडली. यशला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते जमले असताना साउंड बॉक्स सिस्टमचा स्टँड अचानक कोसळल्याने चार जण जखमी झाले. जखमींमध्ये एका विद्यार्थ्याचा समावेश असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. घटनेनंतर सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नेमकं काय घडलं?

Toxic च्या प्री-रिलीज कार्यक्रमासाठी यशला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते मल्ला रेड्डी विद्यापीठात जमले होते. यश स्टेजवरून चाहत्यांना संबोधित करत असताना काही तरुण साउंड बॉक्स सिस्टमच्या स्टँडवर चढले. अचानक या स्टँडचा तोल गेला आणि तो कोसळला. यामुळे त्यावर असलेले चार जण खाली पडले.

एका विद्यार्थ्याच्या पायाला फ्रॅक्चर

या दुर्घटनेत चार जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनेनंतर पोलिसांनी मल्ला रेड्डी विद्यापीठाच्या व्यवस्थापनासह कार्यक्रम व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, नेमकी परिस्थिती आणि सुरक्षाव्यवस्थेचीही चौकशी केली जात आहे.

यशने केली चाहत्यांची विचारपूस

यश स्टेजवर बोलत असतानाच साउंड सिस्टमचा स्टँड कोसळल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने काही क्षण आपले भाषण थांबवून गर्दीतील चाहत्यांची विचारपूस केली. ठतिकडे ठीक आहे ना? कृपया तपासा... काळजी घ्या. तुम्ही सुरक्षित आहात ना?" असे म्हणत यशने चाहत्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचा प्रयत्न केला. यानंतर यशला आणखी काही चाहते एका उंच संरचनेवर चढल्याचे दिसले. त्याने त्यांनाही खाली उतरण्याची सूचना केली आणि त्यानंतर आपले भाषण पुढे सुरू ठेवले.

मोठ्या गर्दीमुळे सुरक्षेचा प्रश्न

Toxic मधील यशची एक झलक पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने चाहते जमा झाले होते. या गर्दीदरम्यान काही चाहते साउंड सिस्टमच्या स्टँडवर आणि इतर उंच संरचनांवर चढल्याचे समोर आले. त्याचवेळी ही दुर्घटना घडल्याने कार्यक्रमातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Toxic मध्ये यश दुहेरी भूमिकेत

Toxic या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केले आहे. चित्रपटाची कथा यश आणि गीतू मोहनदास यांनी लिहिली आहे. गोव्यातील १९४०च्या दशकाच्या सुरुवातीपासून १९७०च्या दशकापर्यंतच्या काळाच्या पार्श्वभूमीवर ही कथा आधारित असल्याचे सांगितले जात आहे.

या चित्रपटात यश दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. Toxic चित्रपट २६ ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके

आमदार तुमच्यासाठी हायकोर्टापेक्षा मोठे आहेत का? मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची कडक शब्दांत खरडपट्टी