भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ट्रायने नागरिकांना सावधानतेचा इशारा जारी केला आहे. फसवणूक करणारे काही लोक ट्रायचे अधिकारी असल्याचे भासवत फोन कॉल किंवा मेसेजद्वारे नागरिकांना धमकावत आहेत. तुमच्या मोबाईल नंबरवर गैरकायदेशीर कृती होत असल्यामुळे नंबर बंद केला जाईल असे सांगून नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये, विशेषतः ‘डिजिटल अटक’ फसवणूकप्रकरणांमध्ये, फसवणूक करणारे TRAI अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत असल्याचे आढळले आहे, असे ट्रायने इशाऱ्यात म्हटले आहे.
आकडेवारीनुसार, यावर्षी आतापर्यंत मुंबईत डिजिटल अटकेच्या एकूण ७० प्रकरणांची नोंद झाली असून, त्यापैकी १६ प्रकरणे उघडकीस आली आहेत आणि २० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ट्रायने आपल्या इशाऱ्यात स्पष्टपणे सांगितले आहे की,
"TRAI कधीही ग्राहकांशी (दूरसंचार वापरकर्त्यांशी) मोबाईल नंबर बंद करण्यासंदर्भात मेसेज किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून थेट संपर्क करत नाही. तसेच अशा कामांसाठी कोणत्याही अन्य संस्थेला अधिकृत केलेले नाही. त्यामुळे जर कोणी ट्राय असल्याचा दावा करून मोबाईल नंबर बंद करण्याची धमकी देत असेल, तर ती फसवणूक असल्याची शक्यता आहे. "बिलिंग, केवायसी किंवा गैरवापर यासारख्या कारणांमुळे मोबाईल नंबर बंद करणे ही जबाबदारी संबंधित दूरसंचार सेवा प्रदात्याची आहे. नागरिकांनी अशा फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नये. अशा कोणत्याही कॉलची खात्री करण्यासाठी संबंधित टीएसपीच्या अधिकृत कॉल सेंटर किंवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा."