नवी दिल्ली : जगभरातील हेरिटेज साइट्सचे जतन व संवर्धन करण्यासाठी ओळखली जाणारी जागतिक संस्था ‘युनेस्को’ने भगवद्गीता व नाट्यशास्त्र या दोन भारतीय ग्रंथांचा आपल्या ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश केला आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या समावेशानंतर या रजिस्टरमधील समाविष्ट भारतीय लिखितांची एकूण संख्या १४ वर पोहोचली आहे.
युनेस्कोने १७ एप्रिल रोजी जगभरातील एकूण ७४ लिखितांचा समावेश या यादीमध्ये केला. त्यात भगवद्गीता व नाट्यशास्त्राचा समावेश आहे. आता वर्ल्ड रजिस्टरमधील लिखितांची एकूण संख्या तब्बल ५७० पर्यंत पोहोचली असून त्यात १४ भारतीय लिखितांचा समावेश आहे.
केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी शुक्रवारी सकाळी यासंदर्भातील माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली. श्रीमदभगवद्गीता व भरत मुनी यांनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताचे शाश्वत ज्ञान आणि कलात्मक नैपुण्य यांचा हा सन्मान आहे, असे शेखावत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद क्षण - मोदी
दरम्यान, शेखावत यांनी केलेली पोस्ट पुन्हा शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सन्मानावर आनंद व्यक्त केला आहे. जगभरात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समावेश होणे हा आपल्या शाश्वत ज्ञान आणि समृद्ध संस्कृतीचा सन्मान आहे. भगवद्गीता आणि नाट्यशास्त्राने अनेक पिढ्यांवर संस्कार केले आहेत आणि अनेक शतकांपासून आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवली आहे. या ग्रंथांमधील ज्ञान हे अवघ्या जगाला कायम प्रेरणा देत राहील, असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’?
युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून जगभरातल्या हेरिटेज वास्तू आणि गोष्टींचे जतन केले जाते. अशा वास्तूंवर ‘जागतिक वारसा स्थळ’ असे नमूदही केलेले असते. भारतासह जगभरात अशी शेकडो ठिकाणे आहेत. युनेस्कोच्या माध्यमातून अशाच प्रकारे जगभरातल्या संपन्न संस्कृती व त्यांचा इतिहास मांडणाऱ्या लिखितांचेही जतन ‘मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टर’च्या माध्यमातून केले जाते. याच यादीत आता भगवद्गीता व नाट्यशास्त्र यांचा समावेश करण्यात आला आहे.