उत्तर प्रदेश : लग्नाचा मंडप सजला होता, नवरदेव लग्नाच्या पोशाखात तयार होता आणि विवाहसोहळ्याची तयारी सुरू होती. मात्र, ऐन लग्नाच्या वेळी एक महिला मंडपात पोहोचली आणि तिने थेट वरालाच जाब विचारला. हा वर दुसरा कोणी नसून तिचाच पती असल्याचा दावा तिने केला. पहिल्या पत्नीपासून कायदेशीर घटस्फोट न घेताच तो दुसऱ्या लग्नासाठी उभा असल्याचा आरोप तिने केला. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात शनिवारी (दि.२१) हा प्रकार घडला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लग्न थांबवलं आणि वराला ताब्यात घेतलं. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे.
सामूहिक विवाह सोहळ्यात पहिली पत्नी अचानक पोहोचली
मिळालेल्या माहितीनुसार, एटा जिल्ह्यातील जीआयसी मैदानावर मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शनिवारी दुपारी हा कार्यक्रम सुरू असताना एक महिला लग्न मंडपात पोहोचली. तिने तिथे असलेल्या वराची ओळख पटवून तो आपला पती असल्याचं सांगितलं. तसेच, आपल्याशी लग्न झालेलं असतानाही आणि कायदेशीर घटस्फोट घेतलेला नसतानाही तो दुसरं लग्न करत असल्याचा आरोप तिने केला.
२०२१ मध्ये झालं होतं पहिलं लग्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराचं नाव आकाश असून तो मिरासराई, मारहरा येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचं नाव राकेश असं आहे. आकाशचं पहिलं लग्न १४ नोव्हेंबर २०२१ रोजी सोनी हिच्याशी झालं होतं. सोनी ही चमन नगरिया येथील रामशरण यांची मुलगी आहे. पहिलं लग्न कायम असतानाही आकाश दुसऱ्या विवाहासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झाल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला.
पोलिसांनी लग्न थांबवलं
महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हस्तक्षेप केला. विवाहविधी पूर्ण होण्यापूर्वीच सोहळा थांबवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतलं आणि मंडपातून कॉलर पकडून बाहेर नेलं. या प्रकारामुळे विवाहस्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
घटनेचा VIDEO व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ६ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये आकाश लग्नाच्या पोशाखात दिसत आहे. त्याने ग्रे रंगाचा सूट, वेस्टकोट आणि टाय परिधान केली आहे. त्याच्या कपाळावर लाल कुंकवाचा टिळाही दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याच्या हाताला धरून मंडपातून बाहेर घेऊन जाताना दिसत आहेत. पहिल्या पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, कायदेशीर कारवाईबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.