राष्ट्रीय

गाझातील युद्धविराम ठरावाला अमेरिकेचा नकार - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या निर्णयावर पॅलेस्टाईनचा रोष

अमेरिकेच्या या कृतीवर अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली. गाझात यापुढे होणाऱ्या रक्तपातास अमेरिका जबाबदार असेल, असे पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी म्हटले.

नवशक्ती Web Desk

संयुक्त राष्ट्रे : गाझा पट्टीत मानवतेच्या दृष्टिकोनातून युद्धविराम लागू करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मांडण्यात आलेला ठराव अमेरिकेने नकाराधिकार (व्हेटो) वापरून हाणून पाडला. त्याबद्दल पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी संताप व्यक्त करत गाझात यापुढे होणाऱ्या रक्तपातास अमेरिका जबाबदार असेल, असे म्हटले आहे.

हमास आणि इस्रायल यांच्यात गेल्या दोन महिन्यांपासून चाललेल्या युद्धाला मानवतावादी दृष्टीने तातडीने विराम देण्यात यावा आणि सर्व ओलिसांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्यात यावी, अशा आशयाचा ठराव संयुक्त अरब अमिरातींनी (यूएई) शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मांडला होता. त्याला ९० हून अधिक देशांनी पाठिंबा दिला होता. या ठरावावर मतदान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्य देशांची शनिवारी बैठक झाली. त्यात १३ देशांच्या प्रतिनिधींनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. ब्रिटनच्या प्रतिनिधीने मतदानात भाग घेतला नाही, तर अमेरिकेने ठरावाच्या विरोधात नकाराधिकार वापरला. त्यामुळे ठराव मंजूर होऊ शकला नाही. अमेरिकेच्या या कृतीवर अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली. गाझात यापुढे होणाऱ्या रक्तपातास अमेरिका जबाबदार असेल, असे पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी म्हटले.

व्हेटो म्हणजे काय?

अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन हे पाच देश संयुक्त राष्ट्रांचे स्थायी सदस्य आहेत. त्यांना 'पर्मनंट-५' किंवा 'पी-५' म्हणून ओळखले जाते. या देशांना व्हेटो म्हणजे नकाराधिकार आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये चर्चेसाठी येणाऱ्या कोणत्याही ठरावाला यातील एकाही देशाने जर व्हेटो किंवा नकार दिला तर तो ठराव संमत होऊ शकत नाही. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि भूतपूर्व सोव्हिएत युनियन (आजचा रशिया) यांनी एकमेकांविरुद्ध अनेक वेळा व्हेटो वापरला आहे. सध्या भारताने सादर केलेल्या अनेक प्रस्तावांवर चीन व्हेटो वापरत असतो.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश