एएनआय
राष्ट्रीय

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली; ३६ प्रवासी ठार, २४ जखमी

बसमधील आसनक्षमता ४३ असताना त्या बसमधून ६० जण प्रवास करीत होते.

Swapnil S

डेहराडून : उत्तराखंडच्या अलमोरा जिल्ह्यात सोमवारी सकाळी एक खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत बसमधील ३६ जण ठार झाले असून, अन्य २४ जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये २२ जण जागीच ठार झाले, तर एक जण रुग्णालयाच्या वाटेवरच मरण पावला, असे अलमोरा जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सांगितले.

गढवाल परिक्षेत्रातील पौरी येथून रामनगर येथे जात असलेली सदर बस गढवाल मोटर मालक संघटनेच्यावतीने चालविण्यात येत होती. रविवारी रात्री निघालेली ही बस सोमवारी सकाळी अलमोराच्या मारचुला परिसरातील २०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात अत्यंत भीषण होता, असे घटनास्थळावरील छायाचित्रावरून दिसून येते. बसमधील आसनक्षमता ४३ असताना त्या बसमधून ६० जण प्रवास करीत होते.

बसचा चक्काचूर

जंगल आणि खडक असलेल्या २०० फूट खोल दरीत बस कोसळली. तिचा चक्काचूर झाला आणि ती जवळच्या नदीपात्रात जाण्यापूर्वीच थांबली. जखमींना जवळच्या रामनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे वृत्त कळताच पोलीस आणि राष्ट्रीय व राज्य सरकारच्या आपत्कालीन प्रतिसाद दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. अपघातामध्ये ठार आणि जखमी झालेल्यांची नावे आणि अन्य तपशील त्वरित कळू शकलेला नाही. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यापैकी तीन जणांना हवाई मार्गाने ‘एम्स’मध्ये हलविण्यात आले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. जिल्हा प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासल्यास गंभीर जखमींना हवाईमार्गेही नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अपघातामध्ये ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची, तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत धामी यांनी जाहीर केली आहे.

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! पुलावरून बस थेट १०० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, २६ जखमी

कचऱ्यावर प्रक्रिया करा वा पैसे भरा! पात्र बल्क वेस्ट जनरेटर्ससाठी प्रतिमहिना २३५ रुपये प्रस्तावित; मुंबई महापालिकेची माहिती

Nashik : निफाड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ओझरमध्ये १०.५ अंश तापमान

५० टक्के जागा वाढवल्यास मतदारसंघ फेररचनेला पाठिंबा; राष्ट्रवादी पवार गटाचा पुनरुच्चार

फोर्स वन आता ATS च्या नियंत्रणाखाली; दहशतवादी हल्ल्यांचा काही वेळातच खात्मा