नवी दिल्ली : केरळच्या मुख्यमंत्रीपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून काँग्रेसने व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेस नेतृत्वाने गुरुवारी (दि.१४) अधिकृत घोषणा करत सतीशन यांची केरळच्या पुढील मुख्यमंत्रीपदी निवड केली. शपथविधी कधी होणार याबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (यूडीएफ) डाव्या आघाडीचा पराभव करत सत्तेत पुनरागमन केल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती.
काँग्रेसच्या ६३ पैकी ४७ आमदारांचा होता वेणुगोपाल यांना पाठिंबा?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांचीही नावे चर्चेत होती. मात्र अखेर व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वावर पक्षाने विश्वास दाखवला.
मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक दिवस पडद्यामागे चर्चा सुरू होत्या. थिरुवनंतपुरम आणि नवी दिल्ली येथे वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठका झाल्या. एआयसीसी निरीक्षक मुकुल वासनिक, अजय माकन आणि केरळ प्रभारी दीपा दासमुंशी यांनी आमदारांशी स्वतंत्र चर्चा केली होती.
काही अहवालांनुसार काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी, ६३ पैकी ४७ आमदारांनी सुमारे के. सी. वेणुगोपाल यांच्या बाजूने मत व्यक्त केले होते. मात्र, २२ आमदार असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) सह प्रमुख यूडीएफ मित्रपक्षांचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील लोकप्रियता यामुळे सतीशन यांचे पारडे जड झाले.
यूडीएफला स्पष्ट बहुमत
४ मे रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालात यूडीएफने १४० पैकी १०२ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. काँग्रेसने एकट्याने ६३ जागा जिंकत आघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला. या विजयामुळे पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न फोल ठरला.
पारावूर मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय
व्ही. डी. सतीशन यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पारावूर मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय मिळवला. त्यांनी सीपीआयचे उमेदवार ई. टी. टायसन मास्टर यांचा २०,६०० मतांनी पराभव केला. सतीशन यांना ७८,६५८ मते मिळाली. २००१ पासून ते सातत्याने पारावूरचे प्रतिनिधित्व करत आहेत.
विरोधी पक्षनेते ते मुख्यमंत्री
२०२१ पासून केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना सतीशन यांनी एलडीएफ सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. प्रशासन, धोरणे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने सरकारला घेरले. यूडीएफच्या प्रचार मोहिमेचा ते प्रमुख चेहरा बनले होते.
विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश
१९६४ मध्ये कोचीजवळील नेट्टूर येथे जन्मलेल्या सतीशन यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. विद्यार्थी चळवळीतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. केरळ स्टुडंट्स युनियन (KSU), एनएसयूआय आणि युवक काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.
१९९६ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक अल्प फरकाने गमावल्यानंतर त्यांनी पारावूर मतदारसंघात मजबूत जनाधार निर्माण केला. त्यानंतर त्यांनी सातत्याने विजय मिळवत काँग्रेसमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
“टीम यूडीएफ” घोषणेची चर्चा
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सतीशन यांनी “टीम यूडीएफ” ही घोषणा पुढे करत धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा जोरदारपणे मांडला. काँग्रेसपासून दूर गेलेल्या समाजघटकांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केल्याचे श्रेयही त्यांना दिले जाते.
निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी यूडीएफला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर सक्रिय राजकारणातून बाजूला होईन, असे जाहीर केले होते. मात्र यूडीएफच्या मोठ्या विजयामुळे आता सतीशन यांचे काँग्रेसमधील राजकीय वजन आणखी वाढले आहे.