"सुरुवातीपासूनच सरकार आणि यंत्रणा त्यांना वाचवत होती"; बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया 
राष्ट्रीय

"सुरुवातीपासूनच सरकार आणि यंत्रणा त्यांना वाचवत होती"; बृजभूषण यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर विनेश फोगटची पहिली प्रतिक्रिया

"आम्ही आशा सोडलेली नाही. महिला कुस्तीपटूंचा हा लढा पुढेही सुरू राहील," असे त्यांनी म्हटले.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सोमवारी (दि. ३) पहिली प्रतिक्रिया दिली. "सुरुवातीपासूनच सरकार आणि संपूर्ण यंत्रणा बृजभूषण यांना वाचवत होती," असा गंभीर आरोप त्यांनी केला. या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू लवकरच उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आम्ही आशा सोडलेली नाही

न्यायालयाच्या निकालानंतर विनेश फोगट यांनी अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. महिला कुस्तीपटूंनी आपल्या वकिलांना या निर्णयाविरोधात अपील करण्याच्या सूचना दिल्या असून, शक्य तितक्या लवकर न्यायालयात अपील दाखल केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

"आम्ही आशा सोडलेली नाही. महिला कुस्तीपटूंचा हा लढा पुढेही सुरू राहील," असे त्यांनी म्हटले.

'बृजभूषण यांना वाचवण्यासाठी यंत्रणा काम करत होती'

विनेश फोगट यांनी सरकार आणि प्रशासनावरही गंभीर आरोप केले. "या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण सरकारी यंत्रणा, सरकार आणि व्यवस्था बृजभूषण शरण सिंह यांना वाचवण्यासाठी काम करत होती," असा आरोप त्यांनी केला.

न्यायालयाने महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमध्ये बृजभूषण शरण सिंह यांना दोषी ठरवले नाही, याबद्दल आम्ही अत्यंत दुःखी आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

'एफआयआरसाठीही मोठा संघर्ष'

फोगट यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षातील प्रभावशाली नेत्याविरोधात एफआयआर दाखल करून घेण्यासाठी महिला कुस्तीपटूंना मोठा संघर्ष करावा लागला.

"आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले. एफआयआर नोंदवून घेण्यासाठी खूप धैर्य दाखवावे लागले. बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून काही मुलींवर दबाव आणला आणि त्यांना प्रकरणातून माघार घ्यायला भाग पाडले. मात्र, अनेक महिला कुस्तीपटू ठामपणे उभ्या राहिल्या आणि न्यायासाठी लढत राहिल्या," असे त्यांनी म्हटले.

दिल्ली न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

सोमवारी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी अश्विनी पंवार यांनी बृजभूषण शरण सिंह आणि WFIचे माजी सहसचिव विनोद तोमर यांना महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळ प्रकरणात निर्दोष मुक्त केले.

निकालानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी हा "सन्मानपूर्वक दिलेला दिलासा" असल्याचे सांगत न्यायालय आणि आपल्या वकिलांचे आभार मानले.

२०२३ मध्ये दाखल झाले होते आरोपपत्र

महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी जून २०२३ मध्ये बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेतील लैंगिक छळ, पाठलाग, गुन्हेगारी धमकी आणि महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बलप्रयोग केल्यासंबंधीच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले होते.

पुढील लढा न्यायालयात

दिल्ली न्यायालयाचा निकाल स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करत महिला कुस्तीपटूंनी आता उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणाला आता न्यायालयीन लढ्याचे नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

नागपुरात मैत्रीला काळीमा! ३ हजारांच्या उधारीपायी मित्रालाच संपवलं, दोघे अटकेत

Mumbai Ganesh Aagman 2026 : बाप्पाच्या आगमनाला सुरुवात! लालबाग-परळमध्ये जल्लोष; अनेक मूर्ती गुजरातकडे रवाना, VIDEO

आयटीमध्ये आता नवीन रोजगार नाही; AI आणि डेटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणूक होत आहे - श्रीधर वेम्बू

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध