नवी दिल्ली : वक्फ सुधारणा कायदा देशात मंगळवारपासून लागू झाला आहे. या कायद्याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी त्याला मान्यता दिली.
या कायद्याविरोधात देशातील अनेक राज्यांत आंदोलने होत आहेत. काँग्रेस, एमआयएम व आप यांनी या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.
केंद्राकडून कॅव्हेट दाखल
वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर १५ एप्रिल रोजी सुनावणीची शक्यता आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहे. याप्रकरणी कोणताही निकाल देताना आमची बाजू ऐकून घ्यावी, असे केंद्राने म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये आंदोलन
वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू झाले आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर भागात आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. रस्त्यावर उतरून जमावाने या कायद्याविरोधात आंदोलन केले. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
वक्फ कायद्याचा विरोध करण्यासाठी निदर्शने सुरू असताना पोलिसांनी हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा संतप्त निदर्शकांनी पोलिसांच्या अंगावर विटांचा मारा केला. तसेच रस्त्यांवर चक्काजाम केला. त्यानंतर निदर्शकांनी रस्त्यांवरील पोलिसांची दोन वाहने पेटवली. ज्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे.