जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र रंगविले जात असतानाच त्या प्रदेशात दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून, त्यामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये राहणाऱ्या अल्पसंख्य समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे. १९९०च्या दरम्यान दहशतवाद्यांनी ठरवून काश्मिरी पंडितांना म्हणजे तेथील हिंदू समाजास लक्ष्य केले होते. त्यामुळे अडीच लाखांहून अधिक हिंदूंना आपला जीव वाचविण्यासाठी काश्मीर खोऱ्यातून अन्यत्र पलायन करावे लागले होते. काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा, तेथून निघून गेलेल्या हिंदूंचे पुनर्वसन होणार, असे वातावरण निर्माण झाल्याचा दावा केला जात होता; पण तेथील परिस्थिती प्रत्यक्षात तशी नसल्याचे दिसून येत आहे. काश्मिरी पंडित आणि काश्मीर खोऱ्यात रोजगारासाठी आलेल्या बिगरकाश्मिरींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने दहशतवाद्यांनी पुन्हा पूर्वीचा मार्ग अवलंबिल्याचे दिसत आहे. दहशतवाद्यांकडून मुद्दाम काश्मिरी पंडितांना, बाहेरून काश्मीरमध्ये नोकरीसाठी आलेल्यांना लक्ष्य केले जात आहे. १ मेपासून ३१ मेपर्यंत काश्मीरमध्ये नऊ जणांची ठरवून हत्या केल्याची उदाहरणे घडली आहेत. या ‘टार्गेटेड किलिंग’ला पायबंद घालण्यामध्ये जम्मू-काश्मीर प्रशासनास अद्याप यश आलेले दिसत नाही. दहशतवाद्यांच्या या ठरवून केल्या जाणाऱ्या निवडक हत्यांमुळे खोऱ्यातील अल्पसंख्य हिंदू समाज भयभीत झाला आहे. आपल्या जीवाचे काही बरे-वाईट होण्याआधीच काश्मीर खोऱ्यातून स्थलांतर केलेले बरे, या विचाराने तेथून स्थलांतर करण्यास प्रारंभही झाला आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये हिंदूंवर आणि स्थलांतरित बिगरकाश्मिरी व्यक्तींवर होणारे हल्ले लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्च पातळीवर बैठकही झाली; पण त्यामुळे तेथे राहत असलेल्या अल्पसंख्य समाजास दिलासा मिळाला असे दिसत नाही. अनंतनाग जिल्ह्यातील मत्तन येथे २०१० पासून ९६ काश्मिरी पंडितांची कुटुंबे राहत होती; पण ‘टार्गेटेड किलिंग’मुळे आता तेथील शासकीय शिबिरांमध्ये फक्त आठ कुटुंबे उरली आहेत, अशी माहिती एका शासकीय अधिकाऱ्याने दिली. शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्या या कुटुंबांच्या व्यतिरिक्त सुमारे २५० कुटुंबे मत्तनमध्ये भाड्याच्या घरांमध्ये राहत होती; पण त्या सर्व कुटुंबांनी आता जम्मूमध्ये स्थलांतर केले आहे, अशी माहितीही त्या अधिकाऱ्याने दिली. अशीच स्थिती सरकारने जेथे अशा संरक्षित वसाहती उभारल्या त्या ठिकाणी दिसून येत आहे. प्रत्यक्ष श्रीनगरमध्ये असणाऱ्या काश्मिरी पंडितांना सुरक्षित वाटत नाही. सरकारने श्रीनगरमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या १७७ काश्मिरी पंडित शिक्षकांची सुरक्षित स्थळी बदली करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या १२ मे रोजी राहुल भट या सरकारी कर्मचाऱ्यांची बडगाम जिल्ह्यातील चादुरा येथे झालेल्या हत्येनंतर विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. सुरक्षित ठिकाणी बदली करण्यात यावी, अशी मागणी निदर्शक कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. आपली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी बदली न करता काश्मीरबाहेर बदली करण्यात यावी, अशी काश्मिरी पंडितांची मागणी आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रशासकीय यंत्रणा दहशतवाद्यांच्या कथित हस्तकांना कशी मदत करीत आहे, याचे प्रत्यंतर या निमित्ताने आले. प्रशासनाने ज्या १७७ काश्मिरी पंडितांची बदली केली, त्या सर्वांची यादी फुटली असून ती समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. ही सूची फुटल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ज्या अधिकाऱ्यांमुळे ही सूची फुटली त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. जम्मू भागात बदली करावी, ही आमची मागणी मान्य करण्याऐवजी ही सूची उघड करून दहशतवाद्यांसाठी सहज लक्ष्य उपलब्ध करून दिले आहे, अशी टीका काश्मिरी पंडितांनी केली आहे. दरम्यान, काश्मीर खोऱ्यामध्ये जे ठरवून हत्यासत्र सुरू आहे, त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी या परिस्थितीबद्दल भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी केंद्र सरकारने एक कृती योजना तयार करावी, अशी मागणी त्यांनी केली. काश्मीरमधील स्थिती हाताळण्याची क्षमता भाजपमध्ये नाही. भाजप केवळ तेथे घाणेरडे राजकारण खेळत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. काश्मीरमधील विद्यमान स्थिती पाहता त्या ठिकाणी पुन्हा दहशतवादी सक्रिय होत आहेत, असे दिसत आहे. शेजारी देशाचे अशा कारवायांसाठी छुपे समर्थन असणार हे सांगण्याची आवश्यकताच नाही. काश्मीर खोऱ्यामधील अल्पसंख्य समाजास सुरक्षित वाटेल या दृष्टीने केंद्र सरकारने कठोर पावले उचलायलाच हवीत. काश्मिरी पंडितांनी पुन्हा काश्मीर खोऱ्यातून स्थलांतर करणे ही स्थिती योग्य नाही. काश्मिरी पंडितांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तेथे निर्माण व्हायला हवे!