AI समिटदरम्यान युवा काँग्रेसचे आंदोलन; टी-शर्ट काढून 'मोदी इज कॉम्प्रमाईज्ड'ची घोषणाबाजी, अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराला विरोध Photo : X
राष्ट्रीय

AI समिटदरम्यान युवा काँग्रेसचे आंदोलन; टी-शर्ट काढून 'मोदी इज कॉम्प्रमाईज्ड'ची घोषणाबाजी, अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराला विरोध

दररोज घडणाऱ्या नवनवीन घडामोडींमुळे दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ खूपच चर्चेत आले आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी समिटमध्ये गोंधळ घालत आपले टी-शर्ट काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांकडून “पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड’ अशा घोषणा दिल्या.

Swapnil S

नवी दिल्ली : दररोज घडणाऱ्या नवनवीन घडामोडींमुळे दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ खूपच चर्चेत आले आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी समिटमध्ये गोंधळ घालत आपले टी-शर्ट काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांकडून “पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड’ अशा घोषणा दिल्या. केंद्र सरकार आणि भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या नाट्यमय आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

दिल्लीत ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ सुरू असलेल्या भारत मंडपम् येथे शुक्रवारी दुपारी युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते टी-शर्ट काढूनच आतमध्ये घुसले. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कार्तकर्ते आणि येथील अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. ऑनलाइन नोंदणीद्वारे क्यूआर कोड मिळवून या आंदोलकांनी आत प्रवेश मिळवला होता.

सुरुवातीला स्वेटर आणि जॅकेट घातलेल्या या तरुणांनी अचानक आपले कपडे काढून शर्टलेस होत निदर्शने सुरू केली. त्यांच्या हातात असलेल्या टी-शर्ट्सवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची छायाचित्रे तसेच भारत-अमेरिका व्यापार करार आणि ‘पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड’ यांसारखे वादग्रस्त घोषणांचे मजकूर छापलेले होते.

या आंदोलनावर जोरदार टीका होत असतानाच, युवक काँग्रेसने आपली बाजू स्पष्ट केली. “लोकशाहीत शांततापूर्ण मार्गाने असहमती व्यक्त करणे, हा आमचा घटनादत्त अधिकार असून, देशाच्या हितासाठीच आम्ही हा आवाज उठवला आहे,” अशा शब्दांत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे.

या घटनेनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात उदय भानू चिब यांनी स्पष्ट केले की, “युवक काँग्रेसचा विरोध जागतिक तंत्रज्ञान परिषदेला नसून, केंद्र सरकारकडून देशाच्या हिताशी होत असलेल्या तडजोडीला आहे. आम्ही रस्त्यावर उतरलो तर आम्हाला रोखले जाते आणि समाजमाध्यमांवर आवाज उठवल्यास आयटी नियमांचा आधार घेऊन पोस्ट हटवल्या जातात. अशा परिस्थितीत तरुणांच्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी हे पाऊल उचलणे भाग होते.”

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीचे काँग्रेसकडून ‘राहुल गांधींचे सोल्जर’ म्हणत कौतुक करण्यात आले. तर, भाजपने काँग्रेसवर सडकून टीका केली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, किरेन रिजिजू, भाजप खासदार संबित पात्रा यांनी काँग्रेसवर कठोर शब्दात टीका केली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी याबाबत सर्व नियोजन झाल्याचा आरोप खासदार संबित पात्रा यांनी केला आहे. राजकीय फायद्यासाठी देशाच्या प्रतिष्ठेला तिलांजली देणे ही खेदाची बाब असून, काँग्रेसने नेहमीच देशहिताऐवजी पक्षहिताला प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधींवर थेट निशाणा साधला. राहुल गांधींच्या अहंकारापोटी आणि नैराश्यातून हे आंदोलन झाले असून, खोट्या प्रचाराच्या आधारे ते भारताच्या विकासाची गती रोखू पाहत असल्याचा आरोप गोयल यांनी केला.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनीही या आंदोलनाचा कडाडून विरोध केला. ही भाजपची निवडणूक रॅली नसून जागतिक व्यासपीठ आहे, याचे भान काँग्रेसने ठेवले नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणत काँग्रेसच्या या भूमिकेवर टीका केली.

पोलिसांकडून १० जण ताब्यात

दरम्यान, या गोंधळप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत सुमारे १० जणांना ताब्यात घेऊन टिळक मार्ग पोलीस ठाण्यात नेले. या घटनेनंतर भारत मंडपम परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक अभ्यागताची अधिक सखोल तपासणी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई सुरू असून, अद्याप ओळख न पटलेल्या इतर सहभागींचा शोध घेतला जात आहे. जागतिक स्तरावरील महत्त्वाची परिषद सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

भाजपकडून काँग्रेसवर टीका

भारताच्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान प्रतिमेला धक्का लावण्याचा आणि १४० कोटी भारतीयांना जागतिक स्तरावर लज्जित करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे म्हणत केंद्रातील अनेक दिग्गज मंत्र्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कृत्याचा तीव्र निषेध करताना म्हटले की, संपूर्ण जग भारत मंडपममध्ये भारताचे तंत्रज्ञान आणि नेतृत्व पाहत असताना काँग्रेसने हे लज्जास्पद कृत्य केले.

ट्रम्प यांना 'सुप्रीम' दणका; टॅरिफचा निर्णय ठरवला बेकायदेशीर; अधिकारांचा अमर्याद वापर केल्याचा ठपका

लाचखोरी प्रकरण : मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव गाडे कार्यमुक्त; तत्काळ कारवाई करीत मूळ विभागात रवानगी

लाच मागितल्याने परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे ACB च्या जाळ्यात

UGC तर्फे ३२ बनावट विद्यापीठांची नावे जाहीर; महाराष्ट्रातील दोन संस्थांचा समावेश; विद्यार्थ्यांनी सावध राहण्याचे आवाहन

हिंदूंचे शोषण रोखणाऱ्यांना हिंदुत्ववाद्यांचा विरोध का?