नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी १ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवून २५७ मद्यपी वाहनचालकांची धरपकड केली आहे. वाहतूक पोलिसांनी या सर्व मद्यपी वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राईव्हनुसार कारवाई केली आहे.
दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांमुळे होणाऱ्या अपघातात निष्पाप लोकांचा हकनाक बळी जात असल्याने वाहनचालकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये यासाठी वाहतुक विभागाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येते. तसेच पोलिसांकडून नियमित ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम देखील राबविण्यात येते; मात्र त्यानंतरही मद्य पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाच्या वतीने आपल्या हद्दीत नियमीतपणे ड्रंक अँड ड्रायईव्हची मोहीम राबवून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
त्यानुसार नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून १ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत वाहतुक पोलिसांना २५७ वाहनचालक मद्य पिऊन वाहन चालवताना सापडले आहेत. या मोहिमेत पोलिसांनी सर्व मद्यपी वाहनचालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह अन्वये कारवाई केली. ही विशेष मोहीम वाशी, एपीएमसी, कोपरखैरणे, रबाळे, तुर्भे, सीवूडस्, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल व इतर अशा एकूण १६ वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये राबविण्यात आली.
ड्रंक अँड ड्राईव्हची ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार असून, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर देखील यापुढील काळात वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी मद्यसेवन न करता सुरक्षितपणे वाहन चालवावे, तसेच वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे व वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे.
- तिरुपती काकडे, पोलीस उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक विभाग