नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा नवी मुंबई शहराला अनधिकृत होर्डिंग्जचा विळखा पडला आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या जाहिराती शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवानगीने लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही त्यांच्या या आदेशाला न जुमानता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग लावले आहेत. हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिका मुख्यालयातील अतिक्रमण विभागाचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या किल्ले गावठाण चौकातही अनधिकृत जाहिरात फलक लागलेले दिसून येतात.