नवी मुंबई

पामबीच मार्गावर बर्निंग कार

Swapnil S

नवी मुंबई : सीवूड्स येथून पामबीच मार्गे वाशी येथे निघालेल्या तरुणाच्या सॅन्ट्रो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी भरदुपारी नेरूळ येथे घडली. सुदैवाने कारचालक तरुणाने वेळीच कारमधून बाहेर पळ काढल्याने तो बचावला. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन या कारला लागलेली आग १५ मिनिटांत आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत सदर कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.

सीवूड्स येथे राहणारा विकास नेर्लेकर हा तरुण शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सीवूड्स येथून आपल्या सॅन्ट्रो झेन कारने पामबीच मार्गावरून वाशी येथे कामानिमित्त जात होता. त्याची कार नेरूळ येथे आली असताना, कारमधून वायर जळाल्याचा वास आला, त्यानंतर कारमधून धूर येत असल्याचे विकासच्या निदर्शनास आले. त्यामुळे विकासने तत्काळ आपली कार रस्त्याच्या बाजूला उभी करून कारमधून बाहेर पळ काढला. त्यानंतर काही वेळातच त्याच्या कारने पेट घेतला.

या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या नेरूळ येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन कारला लागलेली आग १५ मिनिटांत आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत सदर कार पूर्णपणे जळून खाक झाली. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस