नवी मुंबईत ९२५ एकरांवर लॉजिस्टिक पार्क उभारणार; सिडकोकडून पहिल्या टप्प्यासाठी निविदा जाहीर संग्रहित छायाचित्र
नवी मुंबई

नवी मुंबईत ९२५ एकरांवर लॉजिस्टिक पार्क उभारणार; सिडकोकडून पहिल्या टप्प्यासाठी निविदा जाहीर

सिडकोमार्फत नवी मुंबईतील पुष्पक नोड आणि चिरले गावाजवळ ९२५ एकर जागेवर एक भव्य एकात्मिक लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे.

Swapnil S

उरण : सिडकोमार्फत नवी मुंबईतील पुष्पक नोड आणि चिरले गावाजवळ ९२५ एकर जागेवर एक भव्य एकात्मिक लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सिडकोने कंपन्यांकडून स्वारस्य निविदा मागवल्या आहेत. ई-कॉमर्स, उत्पादन क्षेत्र आणि बंदराशी संबंधित व्यापारामुळे सध्या आधुनिक गोदामांची मागणी प्रचंड वाढली असून, ती पूर्ण करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात सिडको चिरले गावाजवळील सुमारे १७४ एकर जमिनीवरील १२ भूखंड ६० वर्षांच्या लीजवर देणार आहे. या जमिनीचा मूळ आधारभूत दर २४,७११ रुपये प्रति चौरस मीटर निश्चित केली आहे. त्यानुसार एका एकरची किंमत साधारण १० कोटी रुपये होते. सिडको आपल्या 'पास-थ्रू पॉलिसी' अंतर्गत एक-टप्पा ई-टेंडर आणि त्यानंतर ई-लिलाव पद्धतीने पारदर्शकपणे या भूखंडांचे वाटप करणार आहे.

विकासकाला आधुनिक गोदामे, माल एकत्रिकरण, पॅकेजिंग, सॉर्टिंग आणि कस्टम - बॉन्डेड वेअरहाउसिंग यांसारख्या सुविधा उभ्या कराव्या लागतील. हा लॉजिस्टिक पार्क जवाहरलाल नेहरू पोर्ट, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर या प्रकल्पांच्या जवळ साकारत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.

या कनेक्टिव्हिटीमुळे हा प्रकल्प देशातील एक प्रमुख 'मल्टीमोडल लॉजिस्टिक हब' म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे.

बड्या गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता

या प्रकल्पाच्या मोक्याच्या स्थानामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बड्या गुंतवणूकदार कंपन्यांनी यात मोठी उत्सुकता दाखवली आहे. सिडकोने आयोजित केलेल्या निविदापूर्व बैठकीला ब्लॅकस्टोन समूहाचे होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स, वेल्सपन, ईएसआर, डीपी वर्ल्ड, हिरानंदानी ग्रुपचे ग्रीनबेस लॉजिस्टिक, कशमन अँड वेकफिल्ड आणि टीव्हीएस लॉजिस्टिक यांसारख्या जागतिक दर्जाच्या दिग्गज कंपन्यांनी हजेरी लावली.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल