समीरा कपूर मुन्शी/नवी मुंबई
कोट्यवधी भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचा उत्सव अडीच महिन्यांवर आला आहे. यंदा आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करताना भाविकांना अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. कारण कच्च्या मालाच्या वाढत्या किमती व वाहतूक खर्च वाढल्याने गणपती बाप्पांच्या मूर्ती २५ टक्के महागणार आहेत. जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या खर्चामुळे पनवेल परिसरातील मूर्तिकारांनी मूर्तींच्या किमतीत २५% पर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
सध्या पनवेलमधील अनेक कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती साकारण्याचे काम वेगाने सुरू आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कारागीर विविध आकारांच्या मूर्ती तयार करत आहेत. मात्र, वाढत्या उत्पादन खर्चामुळे किमती स्थिर ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे.
स्थानिक मूर्तीकारांच्या मते, पश्चिम आशियातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधनाचे दर वाढले आहेत. परिणामी, पेंट्स, प्लास्टिक, ताडपत्री आणि मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या इतर आवश्यक पेट्रोलियम-आधारित उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत.
मूर्ती निर्मितीसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या किमतीत सुमारे २०% वाढ झाली आहे, तर रंगांच्या किमतीत अंदाजे १५% वाढ झाली आहे. यामुळे वाढलेल्या खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे कारागीर सांगतात.
एका स्थानिक मूर्तीकाराने सांगितले की, ‘गेल्या वर्षभरात कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे, त्यामुळे कारागिरांना हा अतिरिक्त भार सोसणे कठीण होत आहे.’
डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे कच्चा माल आणि तयार मूर्ती या दोन्हींच्या वाहतुकीचा खर्च जवळपास ५० टक्क्यांनी वाढल्याचे मूर्तीकारांनी सांगितले. पनवेल हे गणेशमूर्ती निर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र असून, कुंभारवाडा आणि भिंगारी भागात सुमारे दहा मोठे कारखाने कार्यरत आहेत. अनेक कारागीर वर्षभर काम करतात आणि विविध सण व धार्मिक कार्यक्रमांसाठी मूर्ती तयार करतात.
महागाईची चिंता असली, तरी भक्तांमधील उत्साह कायम असल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे. मूर्ती बुकिंगसाठी प्राथमिक चौकशी सुरू झाली असून, अनेक नियमित ग्राहकांनी आपल्या ऑर्डर्स निश्चित केल्या आहेत.
यावर्षी सणाच्या तयारीवर ‘अधिक मासाचा’ प्रभाव पडला आहे. ज्यामुळे गणेशोत्सवाची तारीख नेहमीपेक्षा पुढे गेली आहे. परिणामी, मूर्ती उत्पादनाचे वेळापत्रक आणि बाजारपेठेतील हालचाली काहीशा विलंबाने सुरू आहेत. जुलैपासून बुकिंगच्या प्रक्रियेला गती येईल, अशी अपेक्षा कारागीर व्यक्त करत आहेत.
वाढत्या खर्चाचा मेळ घालण्याचा कारागिरांचा प्रयत्न
पर्यावरणपूरक ‘शाडूच्या मातीच्या’ मूर्तींना भक्तांमध्ये सातत्याने पसंती मिळत असली, तरी वाढता उत्पादन खर्च ही कारागिरांसाठी चिंतेची बाब आहे. वाढत्या खर्चाचा मेळ घालत मूर्तींच्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या कशा ठेवता येतील, यासाठी कारागीर प्रयत्नशील आहेत.