नवी मुंबई : नवी मुंबईतील भूखंडांचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असून ‘सिडको’च्या लिलावांमध्ये विक्रमी दर नोंदवले जात आहेत. सानपाडा, नेरूळ, घणसोली, ऐरोली, बेलापूर, खारघर, पनवेल, कामोठे आणि उलवे परिसरात विकासकामे वेगाने होत असल्याने बांधकाम व्यावसायिकांचा कल या भागांकडे वाढला आहे. त्यातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे क्षेत्राचे महत्त्व अधिकच वाढले असून खारघर हे रिअल इस्टेटचे नवे ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरत आहे.
अलीकडेच झालेल्या सिडकोच्या लिलावात खारघर सेक्टर-२३ मधील सेंट्रल पार्क परिसरातील प्लॉट क्र. ८ (क्षेत्रफळ ४१,९९४ चौ.मी.) या प्रीमियम भूखंडाला तब्बल ५,०६,००१ रुपये प्रति चौ.मी. इतकी विक्रमी बोली मिळाली आहे. यामुळे या भूखंडाची एकूण किंमत जवळपास २१२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे खारघर हे नवी मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेले प्रॉपर्टी डेस्टिनेशन म्हणून पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
सिडकोच्या मार्केटिंग विभागाने खारघर सेक्टर-२३ मधील प्लॉट क्र. ८ विक्रीसाठी ऑनलाइन लिलाव प्रक्रिया राबवली होती. रेसिडेन्शियल आणि कमर्शिअल वापरासाठी असलेल्या या प्लॉटची आधारभूत किंमत ३,५१००१ रुपये प्रति चौ.मी. अशी होती. या प्लॉटला १.५ एफएसआय दिला जाणार आहे.
या लिलावात एकूण आठ बोलीदारांनी सहभाग घेतला होता आणि सर्वांनीच ३.६० लाख रुपयांपेक्षा जास्त दराच्या बोली लावल्या. त्यात आकार ॲस्ट्रोन कंपनीने सर्वाधिक ५,०६,००१ रुपयांची बोली लावत प्लॉट जिंकला. त्यानंतर नोबेल ऑर्गेनिव्हस प्रा. लि. (५,०५,००१ रुपये), लोढा डेव्हलपर्स (५,००,००१ रुपये) आणि फाल्कन लॅण्ड्स प्रा. लि. (४,१४,४१४ रुपये) या कंपन्यांची बोली लागल्या.
शहरातील विविध नोड्ससाठी सिडकोने जाहीर केलेल्या लिलावांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी उच्च बोली लावल्यानंतर काही व्यावसायिक आणि वास्तुविशारदांनी या बोली अवास्तव असल्याची टीका केली आहे. यामुळे आगामी काळात घरांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पूर्वीचाही विक्रम
सिडकोने २५ सप्टेंबर २०२५ रोजी घेतलेल्या लिलावात खारघर सेक्टर-६ मधील प्लॉट क्र. १५ (क्षेत्रफळ ३००१.०३ चौ.मी.) हा भूखंड अभिनंदन बिल्डर्स यांनी ७.३५ लाख रुपये प्रति चौ.मी. या सर्वाधिक दराने जिंकला होता. त्यावेळी या प्लॉटची किंमत सुमारे २२० कोटी रुपये ठरली होती.
सेंट्रल पार्कलगतचा प्रीमियम प्लॉट
मेट्रो लाईन, गोल्फ कोर्स, इस्कॉन मंदिर आणि ‘सेंट्रल पार्क’च्या सर्व्हिस रोडने वेढलेले हे ठिकाण खारघरमधील सर्वात प्रीमियम लोकेशन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे क्लब हाऊस, स्विमिंग पूल, जिमखाना, लँडस्केप गार्डन्स, वॉकिंग ट्रॅक आणि अत्याधुनिक सोयींसह निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारले जातील, असा अंदाज रिअल इस्टेट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
इतर भूखंडांनाही उच्च बोली
सिडकोच्या ताज्या निकालांनुसार खारघर, घणसोली आणि कळंबोली येथील ८ भूखंडांच्या लिलावातही विक्रमी बोली लागल्या. खारघर सेक्टर-८ मधील ४०५० चौ.मी. प्लॉट क्र. १६अ हा भूखंड अरोरा युनिव्हर्सल रियल्टी यांनी ४.५१ लाख रुपये प्रति चौ.मी. दराने जिंकला आहे.