नवी मुंबई

सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोकण विभाग सज्ज; ‘राज्य निवडणूक आयोग’ची आढावा बैठक संपन्न

चालू वर्षात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महापालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आढावा बैठक ‘राज्य निवडणूक आयोग’च्या वतीने ‘आयोग’चे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागात पार पडली. कोकण भवनमधील समिती सभागृहात दोन सत्रांमध्ये सदर बैठक घेण्यात आली.

नवशक्ती Web Desk

नवी मुंबई : चालू वर्षात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि महापालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आढावा बैठक ‘राज्य निवडणूक आयोग’च्या वतीने ‘आयोग’चे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागात पार पडली. कोकण भवनमधील समिती सभागृहात दोन सत्रांमध्ये सदर बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीतील प्रत्येक टप्प्याचा आढावा घेण्यात आला. मतदार यादी अद्यावत करणे, मतदान केंद्रांचे नियोजन, कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था, तसेच मतदार जनजागृतीसाठीच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस ‘राज्य निवडणूक आयोग’चे सचिव सुरेश काकाणी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ‘राज्य निवडणूक आयोग’चे विशेष कार्यकारी अधिकारी अं. गो. जाधव, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, वसई-विरार महापालिका आयुक्त एम. एम. सूर्यवंशी, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, भिवंडी-निजामपूर महापालिका आयुक्त अनमोल सागर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (ठाणे), किशन जावळे (रायगड), इंदूराणी जाखड (पालघर), एम. देवेंदर सिंह (रत्नागिरी), अनिल पाटील (सिंधुदुर्ग) तसेच निवडणुकीशी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोकण विभागांतर्गत येणाऱ्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ७ जिल्ह्यांमध्ये एकूण ७५ विधानसभा मतदारसंघ आहेत. ७ जिल्ह्यांमधील महसूल गावांची एकूण संख्या ६५३० असून या गांवांमधील लोकसंख्या २ कोटी ८६ लाख १ हजार ४७१ आहे. बैठकीदरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, निवडणुकीची तयारी सुक्ष्म नियोजनानुसार पूर्ण व्हावी. कोणत्याही प्रकारचे अडथळे, तांत्रिक अडचणी किंवा मनुष्यबळाची कमतरता वेळेवर दूर करण्यात यावी. दरम्यान, या आढावा बैठकीमुळे कोकण विभागातील निवडणुकीच्या तयारीस वेग मिळाला असून, मतदारांचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सदर टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. याबैठकीत विविध मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

कोकण विभागाचा आढावा

  • ४५ पंचायत समित्या

कोकण विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये ४५ पंचायत समित्या आहेत. त्यात ठाणे ५, पालघर ८, रायगड १५, रत्नागिरी ९ आणि सिंधुदुर्ग ८ अशा पंचायत समित्या आहे.

  • २७ नगरपरिषद-नगरपंचायत

कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ५ जिल्ह्यांमध्ये एकूण २७ नगरपरिषद-नगरपंचायत आहेत. त्यात ठाणे २, पालघर ४, रायगड १० रत्नागिरी ७ आणि सिंधुदुर्ग ४ अशा आहेत.

  • ९ महापालिका

बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी निजामपूर, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, नवी मुंबई अशा एकूण ९ महापालिका आहेत.

सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय वाढवावा. तसेच नागरिकांनी मोठा संख्येने मतदान करून मतदानाच्या टक्केवारीत वाढ करावी आणि लोकशाही बळकट करावी.
दिनेश वाघमारे, आयुवत-राज्य निवडणूक आयोग

Maharashtra Rain : अतिवृष्टीग्रस्त २३ जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर; ३,२५८ कोटींची मंजूरी

मतदार यादीत गोंधळ! संभाजीनगरात ३६,००० डुप्लिकेट नावे; निवडणुका पुढे ढकला, विरोधी पक्षानंतर महायुतीच्या आमदाराची मागणी

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू