चंद्रकांत सुतार / माथेरान
माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंगसारख्या साहसी खेळांना पुन्हा सुरुवात करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची, तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी देखील खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत चर्चा करून सकारात्मक आश्वासन मिळवल्याचा दावा केला आहे.
एकेकाळी परवानगीविना सुरू झालेल्या या खेळात अनियंत्रितपणे अनेकांनी उडी घेतली. मोठ्या उत्पन्नाच्या आशेने राजकीय पाठबळ असलेले काही गट यात उतरले. परिणामी वाद वाढले आणि अखेर वन विभागाने सर्वच व्हॅली क्रॉसिंग बंद केल्या. आज बेरोजगारीच्या छायेत असलेल्या माथेरानच्या तरुणांना या खेळाच्या पुनःप्रारंभाची आशा आहे. मात्र सोशल मीडियावर श्रेयवादाने वादळ उठवले आहे. हा खेळ कोणाच्या मक्तेदारीचा नाही, रीतसर परवानगी घेऊन कायमस्वरूपी सुरू करा, अशी मागणी होत आहे. पण सुरुवात होण्याआधीच राजकीय श्रेयाच्या लढाया झडू लागल्या आहेत.
हे प्रश्न अजूनही अनुत्तरित
-कायदेशीर परवानगी कोणत्या अटींवर दिली जाणार?
-सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?
-नियंत्रण यंत्रणा कोण चालवणार?
-तरुणांना समान संधी मिळणार का?