नवी मुंबई : नवी मुंबईतील दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकाच्या अंगावर एका महिलेने चप्पल फेकून मारली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अतिक्रमण विभागाने तिच्या झोपडीवर कारवाई केली होती. याला जबाबदार तो नगरसेवक असल्याच्या समाजातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
दिघा भागात झोपडपट्टी पुनर्वसन वारे वाहात असून अशा वेळी काही महिन्यापूर्वी झालेल्या कारवाईत काही अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. या भागात फेरफटका मारण्यासाठी म्हणून आठ ते दहा दिवसांच्या पूर्वी राम आशिष यादव आपल्या समर्थकांच्या सह गेले होते. त्यावेळी एका दुकानाच्या समोर एका महिलेने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. ती चप्पल त्यांना लागली व ते त्या महिलेच्या दिशेने गेले. असा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आणि पुन्हा यादव प्रकाशझोतात आले. या प्रकरणी राम आशिष यादव यांना विचारणा केली असता काही लोक पैसे घेऊन झोपडे बनवून विकतात आणि एमआयडीसी त्यावर कारवाई करते. त्यांच्या कारवाईनंतर हा प्रकार घडल्याचे यादव म्हणाले.
विरोधी पक्षनेते म्हणतात, गैरसमजुतीतून घडला प्रकार
शिवसेना नेते व विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना याबाबत विचारणा केली असता घडला प्रकार जुना आहे. ज्या महिलेने चप्पल फेकली तिची झोपडी अनधिकृत ठरवत अतिक्रमण विभागाने कारवाई करीत पाडली. त्यामुळे चिडून तिने यादव यांच्या चप्पल फेकून मारली. त्या महिलेची समजून काढण्यात आली. हा प्रकार गैरसमजातून झाला असून आमच्या दृष्टीने प्रकरण संपलेले आहे. असे चौगुले यांनी सांगितले.